चांदोली अभयारण्य शिकार : तिघांना अटक
By admin | Published: June 21, 2016 11:23 PM2016-06-21T23:23:53+5:302016-06-22T00:06:05+5:30
कॅमेऱ्यात कैद : ‘लोकमत’च्या वृत्ताने जाग
वारणावती : चांदोली अभयारण्यातील चोरट्या शिकारीवर प्रकाशझोत टाकणारी बातमी ‘लोकमत’मधून प्रसिध्द होताच अभयारण्यात प्रशासन खडबडून जागे झाले आणि अभयारण्यातील कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये पाहणी केल्यावर चोरटे कॅमेऱ्यात टिपले गेल्याचे लक्षात आल्यावर अभारण्याशेजारील कुंडी (ता. संगमेश्वर) गावात शोध घेण्यात आला व अंकुश राजाराम जांगळे (४५), सचिन पांडुरंग कोलम (२८), दीपक नरहरी मृदगे (१९) यांना अटक करण्यात यश मिळाले.
सांगली येथे बिबट्याची कातडी तस्करांकडून जप्त केल्यानंतर त्यांनी चांदोली अभयारण्यात बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली. त्यानंतर अभयारण्यात चोरट्या शिकारी होत असल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच अभयारण्य प्रशासन खडबडून जागे झाले.
त्यांनी अभयारण्यात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची पाहणी केली असता, चांदोली (ता. शाहूवाडी) हद्दीतील कॅमेऱ्यामध्ये बॅटरीच्या प्रकाशात बंदूक घेऊन आलेले पाच-चहा शिकारी कैद झालेले आढळले. त्यांचा शोध घेण्यासाठी विभागीय वन अधिकारी एस. एल. झुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार पाटील, वनक्षेत्रापाल प्रज्योत पालवे, अरविंद मांडवकर, विठ्ठल खराडे, ज्ञानदेव परीट, आर. के. पवार, सुनील भिसे, देवकी तासीलदार यांच्या पथकाने कुंडी गावात शोधमोहीम राबवली. त्यामध्ये अंकुश जांगळे, सचिन कोलम, दीपक नरहरी मृदगे त्यांना अटक केली.
या तिघांना शाहूवाडी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)