सांगलीत शिवसेनेकडून चंद्रहार पाटील?, प्रचाराला लागण्याचे ‘मातोश्री’वरून पदाधिकाऱ्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:01 PM2024-03-07T12:01:54+5:302024-03-07T12:02:17+5:30
सांगली : कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना शिवसेनेचा उमेदवार ...
सांगली : कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना शिवसेनेचा उमेदवार गृहीत धरून प्रचाराला लागण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना बुधवारी देण्यात आले.
महाविकास आघाडीची सांगली व कोल्हापूरच्या जागेच्या अदलाबदलीची चर्चा आठवडाभरापासून सुरू आहे; परंतु, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील सांगलीच्या शिष्टमंडळाने ही जागा शिवसेनेस देण्यासाठी मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत विरोध केला होता. त्यानंतर बुधवारी दिवसभरात आणखी काही घडामोडी घडल्या.
दरम्यान, शाहू छत्रपती कोल्हापूरची जागा काँग्रेसकडून लढण्यास तयार झाले. त्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय बुधवारी झाला आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी गृहीत धरुन लोकसभा मतदासंघात प्रचार व मोर्चेबांधणी सुरू करावी. काही दिवसांत त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होईल, असे संदेश शिवसेना पदाधिकाऱ्यांना बुधवारी सायंकाळी देण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रतिक्रिया देण्यास चंद्रहार पाटील यांनी नकार दिला.
आता काँग्रेसची भूमिका काय?
डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील काँग्रेस शिष्टमंडळाने मुंबईतील बैठकीत लोकसभेच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतली होती. आता महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय जाहीर होण्याची वाट पाहणार की काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार? याविषयी उत्सुकता आहे.