मिरजेत सुरेश खाडेंना वगळून होणारे चंद्रकांत पाटलांचे कार्यक्रम, भाजपमधील मानापमान नाट्याची चर्चा

By श्रीनिवास नागे | Published: September 24, 2022 06:08 PM2022-09-24T18:08:22+5:302022-09-24T18:10:03+5:30

मिरजेत कामगारमंत्री सुरेश खाडे यांना वगळून होणाऱ्या कार्यक्रमांना भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला.

Chandrakant Patal programs excluding Suresh Khade | मिरजेत सुरेश खाडेंना वगळून होणारे चंद्रकांत पाटलांचे कार्यक्रम, भाजपमधील मानापमान नाट्याची चर्चा

मिरजेत सुरेश खाडेंना वगळून होणारे चंद्रकांत पाटलांचे कार्यक्रम, भाजपमधील मानापमान नाट्याची चर्चा

googlenewsNext

मिरज :

मिरजेत कामगारमंत्री सुरेश खाडे यांना वगळून होणाऱ्या कार्यक्रमांना भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. यामुळे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेतील नियोजित कार्यक्रम अखेरच्या क्षणी रद्द केले. त्यांच्या कार्यक्रमाचे फलकही उतरवण्यात आल्याने भाजपमधील मानापमानाची चर्चा सुरू झाली आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी यांच्या स्थानिक विकास निधीतून सुशोभिकरणासह चार कार्यक्रमांचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते व खा. संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत मिरजेत आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर भाजपच्या सुकाणू समितीचे सदस्य व माजी नगरसेवक सुरेश आवटी यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही होणार होता. या कार्यक्रमांची सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र कार्यक्रम फलकावर मिरजेचे आमदार तथा कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे छायाचित्रच नव्हते. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत खा. पाटील व सुरेश आवटी यांचेच छायाचित्र होते. 

स्थानिक आमदार व कॅबिनेट मंत्री असताना सुरेश खाडे यांना डावलून कार्यक्रमाचे नियोजन केल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह आवटी विरोधक नगरसेवकांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला. यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता असताना सुरेश आवटींची राष्ट्रवादी व जयंत पाटील यांच्याशी असलेली जवळीक भाजप नेत्यांना खटकत होती. यामुळे खाडे गटाला वगळून होणाऱ्या या कार्यक्रमास आम्ही उपस्थित राहणार नाही, असा पवित्रा भाजपच्या काही नगरसेवकांनी घेतल्याने चंद्रकांत पाटील यांनी मिरजेतील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले. 

मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या घरी भेट देऊन पाटील मुंबईला रवाना झाले. यापूर्वीही आवटी यांनी आ. खाडे गटाला वगळून अनेकदा कार्यक्रम घेतले आहेत. मात्र आता मंत्रीपद मिळाल्यानंतर खाडे गट आक्रमक पवित्र्यात असल्याने त्यांना वगळून होणारा कार्यक्रम रद्द करावा लागला.

Web Title: Chandrakant Patal programs excluding Suresh Khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.