चंद्रकांतदादांचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी गुफ्तगू; सांगली, मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार
By अविनाश कोळी | Published: September 21, 2022 12:00 PM2022-09-21T12:00:47+5:302022-09-21T12:01:42+5:30
जयंत पाटील यांनी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला होता. भाजपने आता स्थायी समितीत त्यांच्या पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला.
अविनाश कोळी
सांगली : राष्ट्रवादीतील नाराजांसाठी एकनाथ शिंदे यांच्या गटासह आता भाजपनेही गळ टाकला असून, मिरजेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांशी भाजपचे नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी रात्री बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे येत्या दाेन महिन्यात सांगली, मिरजेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. दिवसभरातील सर्व कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी रात्री भाजपच्या शहरातील एका ज्येष्ठ नेत्याच्या घरी भेट दिली. यावेळी मिरजेतील तीन नगरसेवकांशी पक्षप्रवेशाबाबत थेट चर्चा करण्यात आल्याचे समजते. महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ताकदीला सुरुंग लावण्याची तयारी भाजपने केली आहे. स्थायी समिती सभापती निवडीत जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला. पक्षीय स्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी मिरजेतील तीन नगरसेवकांनी आता भाजप प्रवेशाची तयारी केली आहे.
सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यावेळी भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना घरी निमंत्रित केले. चंद्रकांत पाटील व त्यांची भेट घडवून आणली. निवासस्थानातील बंद खोलीत त्यांच्यात चर्चा झाली. राष्ट्रवादीसाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे.
मिरजेतील ज्येष्ठ भाजप नगरसेवकाचा हात
मिरजेतील एका ज्येष्ठ भाजप नगरसेवकाने मिरजेतील राष्ट्रवादी नगरसेवकांना भाजपमध्ये खेचण्यासाठी ताकद लावली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशीही त्यांची मैत्री असली तरी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी या नेत्याने ‘फिल्डिंग’ लावली आहे.
शिंदे गटात न जाण्याचा सल्ला
भाजपच्याच नेत्यांनी राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना शिंदे गटात जाण्याऐवजी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे. प्रभागात भाजपचा विरोधक असल्याने काहींनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय अंतिम केला आहे. ज्यांना फार काही फरक पडत नाही, ते दोन्हीकडून चांगल्या ऑफरच्या शोधात आहेत.
जयंतरावांसाठी दोन ‘करेक्ट कार्यक्रम’
जयंत पाटील यांनी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला होता. भाजपने आता स्थायी समितीत त्यांच्या पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला, मात्र भाजपच्या नेत्यांना एका ‘कार्यक्रमा’च्या बदल्यात दोन ‘करेक्ट कार्यक्रम’ जयंतरावांना भेट द्यायचे असल्याने त्यांनी त्यांचा येथील पक्ष फोडण्याची तयारी केल्याचे समजते.