चंद्र्रकांत पाटलांनाच ईव्हीएम का आठवले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 11:55 PM2018-08-05T23:55:41+5:302018-08-05T23:55:46+5:30
सांगली : आम्ही ईव्हीएमचा विषयसुद्धा काढला नव्हता, तेवढ्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच ईव्हीएम कसे आठवले, असा सवाल राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आमचा पराभव भाजपमुळे नव्हे, तर बंडखोरांमुळे झाला असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ते म्हणाले की, आम्ही पैशाचा विषय न काढताच चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच भेटवस्तू वाटपाचा विषय जाहीर सभेत काढला. महापालिका निवडणुकीत आम्ही बॅगा भरून येणार असल्याचे त्यांनीच स्पष्टपणे सांगितले होते. आम्ही निकालानंतर कोणतेही भाष्य केले नव्हते, तोपर्यंत त्यांनीच ईव्हीएमबद्दलची शंका उपस्थित करणारे विधान केले. आता चंद्रकांत पाटील यांनाच अशा गोष्टी का आठवतात, हे काही कळत नाही. त्यामुळे त्यांनी हे प्रश्न स्वत:लाच विचारावेत. निवडणुकीत केवळ ३४ टक्के मते मिळवून कॉँग्रेसमुक्तीचे स्वप्न त्यांनी पाहू नये. विजयाने हुरळून न जाता येथील जनतेला जी आश्वासने त्यांनी दिली आहेत, ती कशी पूर्ण होतील, याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी दिलेला कौल व आमचा पराभव आम्ही मान्यच करतो, मात्र हा पराभव आमच्यातील बंडखोरांमुळेच झाला आहे. अनेक जागांवर कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला. बंडखोरांच्या आमच्यातील मतांची बेरीज केली तर ती भाजपच्या विजयी उमेदवारांपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे आमचा पराभव भाजपने नव्हे, तर आमच्याच बंडखोरांनी केला आहे. आकडेवारी पाहिली तर भाजपला केवळ ३४ टक्के मते मिळाली आहेत. याचाच अर्थ ६६ टक्के लोकांनी त्यांना स्पष्टपणे नाकारले आहे. त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. कॉँग्रेसच्या बंडखोरांना ५० हजार, तर राष्टÑवादी बंडखोरांना ६४ हजार मते मिळाली आहेत. हा आकडा मोठा आहे. त्यामुळे बंडखोरांना थोपविण्यात यश मिळाले असते तर, कदाचित निकाल वेगळा लागला असता.
महापालिकेत आमचा पराभव झाला म्हणून आम्ही व आमचे उमेदवार नाउमेद होणार नाहीत. खच्चीकरण होऊ न देता ताकदीने आम्ही येथील जनतेसाठी लढत राहणार आहोत. आघाडीच्या धोरणावरही या निकालाचा परिणाम होणार आहे. महापालिका निवडणुकीत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेऊ.
घोटाळ््यांची चौकशी कराच!
महापालिकेतील गेल्या काही वर्षातील घोटाळ््यांची चौकशी चंद्रकांत पाटील यांनी जरूर करावी. यात जे सापडतील त्यांचे सदस्यत्वही रद्द करावे. असे केल्यास महापालिकेत ते पुन्हा अल्पसंख्याक झाल्याची जाणीव त्यांना होईल. भाजपचे लोक आलेत म्हणून त्यांनी चौकशी थांबवू नये. यापूर्वीही राज्यात सत्ता मिळविल्यानंतर त्यांच्या सरकारने अशीच घोषणा केली होती. गेल्या चार वर्षांत एकही घोटाळा ते शोधू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी खुशाल महापालिकेतील प्रकरणांची चौकशी करावी, असे जयंत पाटील म्हणाले.
३४ टक्केवाल्यांनी कॉँग्रेसमुक्तीचे स्वप्न पाहू नये!
चंद्रकांत पाटील व त्यांच्या भाजपवाल्यांनी केवळ ३४ टक्के मते मिळवून कॉँग्रेसमुक्तीचे स्वप्न पाहू नये. टक्केवारीचाच विचार केला, तर आघाडीला मिळालेली मते ३७ टक्क्यांच्या घरात जातात. म्हणजे आम्हाला मिळालेले मतांचे पाठबळ हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
पेढा लोकसभेचा की विधानसभेचा?
भाजपचे लोक स्पष्ट काही कोणाला सांगत नसतात. खासदार संजयकाकांना चंद्रकांत पाटील यांनी जो पेढा भरविला तो लोकसभेसाठी होता की विधानसभेसाठी हेसुद्धा बऱ्याचजणांना कळाले नाही. त्यांची ती पद्धतच आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.