भाजपमध्ये कोणी येण्याची आता आवश्यकता नाही: चंद्रकांत पाटील
By अविनाश कोळी | Published: September 19, 2022 08:31 PM2022-09-19T20:31:41+5:302022-09-19T20:32:50+5:30
विश्वजित कदमांचा भाजपकडे प्रस्तावच नाही
अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी भाजपमध्ये येण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा चुकीची आहे. सध्या भाजपमध्ये कोणी येण्याची फार आवश्यकता नाही, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सांगलीत विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात आमची सत्ता आल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमधील काठावर असणारी मंडळी आता भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत हे चित्र आहे. महाराष्ट्रात सध्या आम्ही क्रमांक एकवर आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांची उरलीसुरली ताकदही संपेल.
विश्वजित कदम यांनी भाजपकडे कोणताही प्रस्ताव अद्याप दिलेला नाही. त्यापूर्वीच माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. कदम यांच्याकडून तसा प्रस्ताव आल्यास जगताप यांचेही मत विचारात घेतले जाईल. कदम यांना घेतानाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचार करून निर्णय घेतला जाईल. ईडीच्या दबावापोटी लोक आमच्याकडे येताहेत, या सर्व विरोधकांच्या अफवा आहेत. त्या स्वायत्त संस्था असून, त्यांच्या कारवाईबाबत कुणीही बोलणे योग्य नाही. तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना त्यांचे काम करू द्यावे.
ठाकरेंची पिछेहाट, पवारांचा प्रभाव संपवणार
एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुतांश आमदार, खासदार आल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची खूप पिछेहाट झाली आहे. काँग्रेसची ताकद संपुष्टात आली आहे. आता बारामतीमधील पवारांचा प्रभाव आम्ही संपवत चाललो आहोत. वर्षभरात त्यांचा राज्यात कोठेही प्रभाव राहणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.