लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार बदला-: प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील नावांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:00 AM2019-01-19T00:00:35+5:302019-01-19T00:08:30+5:30
गत लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. आता भाजपचा पराभव करायचा असेल तर उमेदवार बदला, असा सूर शुक्रवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निघाला.
सांगली : गत लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. आता भाजपचा पराभव करायचा असेल तर उमेदवार बदला, असा सूर शुक्रवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निघाला. उमेदवारीसाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावांची चर्चाही बैठकीत झाली. तसेच काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मात्र लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचा पुनरूच्चार केला.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस कमिटीत पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, पक्षनिरीक्षक प्रकाश सातपुते, सहनिरीक्षक संजय पाटील यांच्यासह पार्लमेंटरी बोर्डाचे ४५ सदस्य उपस्थित होते. बंद दरवाजाआड झालेल्या या बैठकीत उमेदवारीवरून जोरदार चर्चा झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. यामध्ये सांगलीत भाजपचा पराभव करायचा असेल तर नवा चेहरा देण्याचाही सूर काही सदस्यांनी आळवला. पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीबाबत अनेकांनी समर्थन केले, तर वसंतदादा गटाकडून प्रतीक पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.
प्रतीक पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यास विशाल पाटील यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी भूमिकाही या गटाने घेतली. डॉ. विश्वजित कदम यांनी मात्र, पुन्हा मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करीत, पक्ष देईल त्या उमेदवारासाठी रात्रीचा दिवस करू असे सांगितले. पृथ्वीराज पाटील यांनी जिल्ह्यात फिरून मते अजमावली असून भाजपविरोधी रोष एकदिलाने एकवटल्यास पुन्हा सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला होईल, असे स्पष्ट केले. तसेच प्रतीक पाटील यांनी, उमेदवारीसोबतच मनोमीलन होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सदाशिवराव पाटील, विक्रम सावंत, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, प्रा. सिद्धार्थ जाधव, संजय मेंढे, वहिदा नायकवडी, बिपीन कदम यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेशला अहवाल देणार : सातपुते
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पक्षनिरीक्षक प्रकाश सातपुते, संजय पाटील म्हणाले, राज्यात भाजपविरोधी लाट आहे. त्यामुळे जिल्ह्यात तळागाळापर्यंत जाऊन मोर्चेबांधणी करा. यासाठी एकदिलाने लढायची तयारी ठेवू. त्यांनी सर्वच ४५ सदस्यांच्या भूमिका ऐकून घेतल्या. येत्या २१ जानेवारीला मुंबईत राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांसाठी पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार आहे. त्यानुसार आता मी, मोहनराव कदम तसेच संजय पाटील चर्चा करून इच्छुकांसह उमेदवाराबाबत लवकरच प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. सांगली लोकसभेचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय प्रदेश पार्लमेंटरी बोर्डच घेणार आहे हे जरी खरे असले तरी, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार करुनच उमेदवाराचे नाव निश्चित करणार आहे, असेही प्रकाश सातपुते यांनी सांगितले आहे.