शाळकरी मुलांची बस अंधारातच का धावते?, मिरज तालुक्यातील प्रकार; मुलांचा जीव मुठीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 04:35 PM2023-02-01T16:35:44+5:302023-02-01T16:36:09+5:30
आमदारांच्या पत्राला किंमत नाही
सांगली : पहाटेची बस बंद झाल्याने गावातील पोरांना सोडण्यासाठी पालकांची कसरत सुरू झाली आहे. सायंकाळच्या बसने उशिरा रात्रीचा प्रवास सुरू केल्याने परतीच्या प्रवासात गावातील निर्जन स्थळावरून घर गाठताना मुले भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मिरज तालुक्यातील सावळी, तानंग, कानडवाडी, मानमोडी, कांचनपूर, अहिल्यानगर, खोतवाडी याठिकाणच्या शेकडो मुलांचा हा प्रश्न एसटी महामंडळाकडून बेदखल केला गेला आहे.
सांगली ते मानमोडी ही सकाळी सहाची बस आता बंद झाली आहे. त्यामुळे भल्या पहाटे उठून पालकांना अंधारातच शहरातील शाळा, क्लासेस, अकॅडमीमध्ये सोडावे लागत आहे. पालकांची यामुळे कसरत सुरू झाली आहे. मुलांना शाळा, क्लासेसमधून परतायचे असल्यास सांगली ते मानमोडी ही सहा वाजेची बस आहे. ती नेहमी उशिरा सुटते व अंधारात धावत येऊन मुलांना सोडते. निर्जन रस्त्यावरून या मुलांना भीतीच्या छायेखाली वावरत घर गाठावे लागते. हा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे पालक हैराण झाले आहेत. तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही.
मुलांच्या शिक्षणात बसमुळे अडथळे
सकाळची बस बंद असल्यामुळे अनेक पालक दुचाकीवरून त्यांना शहरात सोडतात. मात्र, ज्यांच्याकडे दुचाकीसुद्धा नाही किंवा संबंधित पालकांना कामानिमित्त बाहेर राहावे लागते अशांची मुले अनेकदा शाळेत जात नाहीत. त्यांच्या शिक्षणात बससेवेअभावी अडथळा निर्माण झाला आहे.
आमदारांच्या पत्राला किंमत नाही
मिरजेतील या छोट्या गावातील मुलांच्या प्रश्नाची आमदार मोहनराव कदम यांनी दखल घेतली. त्यांनी याबाबतचे एक पत्र एसटी महामंडळाला दिले. त्या पत्रालाही अदखलपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
काय आहे मागणी
- मानमोडीतून सकाळची बससेवा पूर्ववत करावी
- सांगलीच्या स्टँडवरून मानमोडीला जाणारी बस सव्वापाच वाजता सोडावी.
- स्टँडवर लाउडस्पीकरवर बसबाबतची माहिती देण्यात यावी
सांगली ते मानमोडी मार्गावर बस पूर्वीप्रमाणे वेळेवर सोडण्याबाबत निवेदन दिले आहे. सायंकाळची बस सव्वापाच वाजता स्टँडवरून सोडल्यास सर्व मुली वेळेवर घरी पोहोचतील. महामंडळाने विद्यार्थ्यांना बेदखल करण्याची मानसिकता बदलून त्यांच्या सोयीचा विचार करायला हवा. - सुभाष खोत, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस