फुकटात पाणी मागण्याची मानसिकता बदला
By admin | Published: March 17, 2016 12:23 AM2016-03-17T00:23:41+5:302016-03-17T00:27:16+5:30
शेखर गायकवाड : जल जागृती सप्ताहास उत्साहात प्रारंभ
सांगली : पाण्याच्या अमर्याद वापरामुळे आपण नव्या पिढीच्या हातात ओसाड, क्षारपड जमीन आणि कोरड्या नद्या देणार आहोत का?, याचे आत्मचिंतन प्रत्येकाने करण्याची गरज आहे. भविष्यात पाणी संकटामुळे महायुद्ध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह शहरी नागरिकांनीही फुकट पाणी मिळावे, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.
जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित जल जागृती सप्ताहाच्या प्रारंभप्रसंगी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त अजिज कारचे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कृष्णा कोयना उपसा सिंंचन प्रकल्प मंडळ सांगलीचे अधीक्षक अभियंता एच. टी. धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गायकवाड पुढे म्हणाले की, केवळ भित्तीपत्रके, घोषणा करून जल जागृती होणार नाही. प्रत्यक्ष गावे, शहरे आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना पाण्याचे महत्त्व अधिकाऱ्यांनी पटवून दिले पाहिजे. शहरे आणि महानगरांमध्ये पाण्याच्या अमर्याद वापरामुळे कालव्यातील पाणी संपू लागले आहे. परिणामी शेतीला पाणी मिळत नाही. आपण दैनंदिन जीवनात पाण्याचा अनावश्यक वापर करतो. घरी आलेल्या पाहुण्यांना ग्लास भरून दिलेले पाणी ते पितातच असे नाही. चार कोटी लोकांच्या घरात रोज दोन ग्लास पाणी वाया जाणे परवडणारे नाही. हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. दुसरीकडे मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी पाण्याच्या अमर्याद वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याच्या घटनाही घडताना दिसत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात घरी व शेतीसाठी पाण्याच्या वापराबाबत सर्वांनी संवेदनशील राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
एच. व्ही. गुणाले यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये जल जागृती सप्ताहांतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जलसंपदा विभागामार्फत तयार करण्यात आलेला जलमहत्त्व सांगणारा लघुपट प्रसारित करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी अभियंता कडूसकर यांनी आभार मानले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी वैशाली यांनीही पाणी बचतीचे महत्त्व सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील म्हणाले की, ठिबक सिंचनचे महत्त्व समजून घ्यावे. पाण्याची उधळपट्टी करण्याची मानसिकता बदलावी. (प्रतिनिधी)
महापालिका पाणी कपात करणार : अजिज कारचे
जल जागृती सप्ताहांतर्गत महानगरपालिका लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांच्यामार्फत जनजागृती करणार आहे. याचबरोबर महापालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाण्याचा नागरिकांनी काटकसरीने वापर करावा, म्हणून दिवसातून दोन वेळा पाणी सोडण्याऐवजी एकच वेळ पाणी सोडण्यात येईल. तसा ठराव येत्या महापालिका सभेत मंजूर करून घेण्यात येईल. यास महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवक सहकार्य करतील, असा विश्वास महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी व्यक्त केला.
भविष्यात जलमाफिया तयार होतील : फुलारी
सध्या वाळूमाफिया जिल्ह्यातील एकाही ओढापात्रात वाळू शिल्लक ठेवत नाहीत. त्यांनी रात्रीचा वाळू उपसा करून नद्या व ओढे भकास केले आहेत. त्याचा पर्यावरणावरही परिणाम होत आहे. याचप्रमाणे भविष्यात जल माफियाही वाळू माफियांप्रमाणेच पाण्याची चोरी करणार आहेत. त्यामुळे आता आम्ही वाळू माफियांच्या मुसक्या आवळत आहोत. पण, भविष्यात पोलिसांची जबाबदारी वाढणार आहे. जल माफियांवरही कारवाईची मोहीम त्यांना उघडावी लागेल, असे मत सुनील फुलारी यांनी व्यक्त केले.
नांदेड पॅटर्न राबविणार
पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा अनावश्यक वापर टाळावा. निसर्गाने विपुल प्रमाणात दिलेले पाणी साठवून ठेवले पाहिजे. त्यासाठी नागरिकांच्या दृष्टिकोनात बदल होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने जुन्या नळजोडण्यांची दुरूस्ती, तसेच गळती होणाऱ्या जलवाहिन्यांची दुरूस्ती, याबरोबरच नांदेड पॅटर्न म्हणून नावारूपास आलेले ‘मॅजिक पिट’ बसवणे, असे उपक्रम जल जागृती सप्ताहांतर्गत हाती घेतले आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.