दानशूरपणातून पालटले शाळांचे रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:45 PM2017-09-04T23:45:45+5:302017-09-04T23:45:45+5:30

Changes in schools of philanthropy | दानशूरपणातून पालटले शाळांचे रूपडे

दानशूरपणातून पालटले शाळांचे रूपडे

Next



दत्ता पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : ‘देणाºयाने देत जावे, घेणाºयाने घेत रहावे,
देता घेता घेणाºयाने, देणाºयाचे हातही घ्यावे’,
या कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींप्रमाणे तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांतील शिक्षकांनी नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. बदलत्या शैक्षणिक पध्दतीचा अंगिकार करण्यासाठी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करण्यात पुढाकार घेतला. अशा शिक्षकांच्या दानशूरपणातून जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पालटले आहे.
कवठेएकंद येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक दोनच्या शिक्षिका सुनीता शहाजी गोरवे-देशमुख यांनी पतीच्या वर्षश्राध्दाच्या खर्चाची रक्कम स्वत: शिकवत असलेल्या शाळेसाठी देणगी म्हणून दिली. सुमारे पंंधरा हजार रुपये खर्च करुन पहिलीच्या वर्गासाठी ओव्हरहेड प्रोजेक्टर खरेदी केला.
बस्तवडे येथील दुशारेकर-गायकवाड वस्ती जिल्हा परिषद शाळेत काही महिन्यांपूर्वीच स्फूर्ती निकम यांची शिक्षण सेवक म्हणून नव्याने नेमणूक झाली होती. द्विशिक्षिकी आणि वस्ती भागातील नेमणूक झालेली या शाळेची अवस्था पूर्वी जेमतेमच होती. नेमणूक झाल्यानंतर काही महिन्यांनी निकम यांचे लग्न झाले. लग्नात मिळालेल्या आहेराच्या रकमेत स्वत:जवळची काही रक्कम घालून दहा हजार रुपयांची देणगी शाळेसाठी दिली.
तालुक्यातील धामणी-पाडळीलगत काही अंतरावर माळेवाडी येथे जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी शाळा आहे. जळगाव जिल्ह्यातील दिनेश तेली यांची या शाळेत २००७ मध्ये शिक्षक म्हणून नेमणूक झाली. तीस पट असलेल्या या द्विशिक्षकी शाळेत सुमारे दोन वर्षे शिक्षकाची एक जागा रिक्त होती. एकच शिक्षक आणि शालाबाह्य काम, बैठका यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, म्हणून या शिक्षकाने बी.एस्सी. असलेल्या स्वत:च्या पत्नीला शाळेत आणण्यास सुरुवात केली. कोणतेही मानधन मोबदला नसतानादेखील पती, पत्नीने एकत्रित मुलांना शिक्षक देण्याचे काम केले. शाळेतील मुलांना शिक्षण देण्यासाठी स्वत:च्या पैशांतून लॅपटॉप, प्रोजेक्टर आणि टॅब हे साहित्य शाळेसाठी खरेदी केले. या शिक्षकांची तळमळ पाहून पालकांनीदेखील सुमारे एक लाख ७५ हजार रुपयांची वर्गणी उत्स्फूर्तपणे देऊन शाळा डिजिटल केली. आज शाळेतील सर्व मुले टॅबवर शिक्षण घेत आहेत.
कवठेएकंद येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा इमारतीला लाजवेल, अशा दर्जाच्या शाळा इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी लोकवर्गणी घेण्यात आली. त्यामध्ये या शाळेतील रुपाली गुरव, सुरेखा पाटील, वसुंधरा शिरोटे, सरोजिनी मगदूम, सुरेखा जायाप्पा, रघुनाथ थोरात, नेताजी कांबळे, प्रल्हाद शिंदे, मनोजकुमार डांगे, मनोजकुमार थोरात, पुष्पा खरशिंगकर, ज्योती कोरे, वंदना कदम, सलमा कुटवाडे, प्रभावती पाटील, मंगल पाटील या १६ शिक्षकांनी सुमारे ३ लाख ६० हजार रुपयांची देणगी शाळा बांधकामासाठी दिली. सावळजमधील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेतील शिक्षकांनी सहा प्रोजेक्टर घेतले आहेत.
शिक्षकांइतकेच अधिकाºयांनीही शाळांसाठी योगदान दिले. तासगाव पंचायत समितीतील शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला एलईडी भेट दिला. पेड येथील एका विद्यार्थिनीला मलेशिया येथे आंतरराष्टÑीय स्पर्धेला जाण्यासाठी आर्थिक मदत केली. कांबळे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनीदेखील अनेक शाळांत ई-लर्निंगसाठी आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
दानशूरपणातून शाळांच्या सर्वांगीण परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. तालुक्यातील अशा अनेक शिक्षकांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.
शैक्षणिक उठावाला हातभार
शाळांना डिजिटल शिक्षण पध्दतीचा अंगिकार करणे आवश्यक होते. ई-लर्निंगसाठी, ज्ञानरचनावाद यासाठी निधीची आवश्यकता होती. तालुक्यातील अनेक शिक्षकांनी स्वत: देणगी देण्यास सुरुवात केली. या दानशूरपणामुळे पालकांनीही स्वयंस्फूर्तीने देणगी दिली. त्यामुळे बहुतांश जिल्हा परिषद शाळांंचे रुपडे पालटले आहे. २०१५-१६ या वर्षात सुमारे एक कोटी रुपये, तर २०१६-१७ या वर्षात ३५ लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव लोकवर्गणीतून झाला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली.

Web Title: Changes in schools of philanthropy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.