बदलते श्वसनविकार; समस्या आणि उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:51+5:302021-03-04T04:47:51+5:30
वातावरणातील बदल हे पूर्वीपेक्षा वेगाने पुढे-मागे होत आहेत. थंडी पडली तर कडाक्याची, पाऊस आला तर महापूर, उन्हाळा आला की ...
वातावरणातील बदल हे पूर्वीपेक्षा वेगाने पुढे-मागे होत आहेत. थंडी पडली तर कडाक्याची, पाऊस आला तर महापूर, उन्हाळा आला की बाहेरच पडू नये असा... असे चित्र गेल्या काही वर्षांत आढळते आहे आणि आता तर अजून कोरोना काळ संपलेला नाही. वातावरणातील बदलाबाबत एवढे सविस्तर लिहिण्याचे कारण, ज्यांना श्वसनाचा वारंवार किंवा केव्हा तरी त्रास झाला आहे, त्यांना समजेल.
अचानक छाती भरून येणे, छातीवर दडपण येणे, छातीवर दाब आल्यासारखा वाटणे, दम लागणे, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अगदी घराबाहेर असतानाही खोलीत कोंडल्यासारखे वाटणे, अशा तक्रारींनी, नवखीच काय, असा त्रास वारंवार होणारी व्यक्तीही घाबरते. ताबडतोब उपचार घेतल्याशिवाय बरे वाटत नाही. केवळ दमा, सीओपीडी, ब्राँकॉयटिस, न्युमोनिया, आयएलडी अशा सर्वांना माहीत असलेल्या श्वसनविकारांमुळेच हा त्रास होतो असे नाही, तर त्याहीपलीकडे अनेक समस्या आहेत. ज्यावर नव्याने संशोधन झाले आहे, होत आहे.
कोरोनामुळे सर्दी, ताप, घसा दुखण्यापासून सुरुवात झालेला विकार, खोकला आणि दम लागून न्युमोनिया होऊन त्रासदायक ठरतो. वाचक हो! कोरोना संपलेला नाही. कोरोना आता पूर्वीसारखा प्रकट होत नाही. कोरोना विषाणूमध्ये उत्परिवर्तन (म्युटेशन) झाल्याने कोरोना विषाणूच्या वर्तणुकीत बदल झालेले दिसतात. त्यामुळे लक्षणेही वेगळी आहेत. केवळ ताप, अंगदुखी आणि प्रचंड अशक्तपणा ही कोरोनाची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष नको.
आजकाल कोरोना संसर्ग असूनदेखील कोरोनाचा न्युमोनिया असताना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येते, हे लक्षात घेऊन वेळीच उपचार व्हायला हवेत. पूर्वी छातीच्या एक्स-रेवरून कोरोनाचे सहज निदान व्हायचे. दिलासादायक बाब म्हणजे आताचा विषाणू हा कमी तीव्र असून पूूर्वीइतका जीवघेणा नाही.
श्वसनांची कोणतीही तक्रार, मग ती धाप असो, खोकला, कफ, सर्दी, शिंका, छातीत दुखणे, छाती घरघरणे असो, त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. अनेकांची जीवनशैली सैलसर असते. अवेळी किंवा बाहेरचे खाणे, पिणे, व्यायामाचा, विश्रांतीचा अभाव यामुळेसुद्धा अनेक श्वसनविकार उद्भवतात. ज्यांना सांधेदुखी, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, एसएलई, ॲलर्जी, एक्झिमा, सोरायसीस अशापैकी एखादा विकार असतो, तेव्हा त्यांची रोगप्रतिकार यंत्रणा कमकुवत झालेली असते. याचा परिणाम श्वसनावर होतो. परिणामी भूक मंदावणे, वजन कमी होणे, अशक्तपणा अशा दुष्टचक्रात व्यक्ती अडकते. तात्पुरती औषधे, मध्येच स्टेरॉईडचा मारा आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचारास चालढकल, यामुळे काट्याचा नायटा होतो. आजार बळावतो. पण, पुढे उपचारात हयगय केली नाही, तर रुग्णाला दिलासा मिळतो.
आपल्याकडे लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. संसर्गजन्य रोग किती वेगाने पसरतो हे कोरोनाने दाखवून दिले आहे. कोरोनाचा विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेशतो. आपल्याभोवती. लाखो विषाणू, जिवाणू हवेत तरंगत असतात. शरीरावरदेखील या जंतूंचे वास्तव्य असते. संधी मिळाली की ते शरीरात शिरतात आणि इम्युनिटी कमी असेल, तर आक्रमण करतात आणि न्युमोनियाला पर्याय नसतो. यासाठी प्रत्येकाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आजच्या घडीला महत्त्वाचे ठरते. कोणत्याही अल्प मुदतीच्या किंवा दीर्घकालीन श्वसनविकारावर तात्पुरता उपचार किंवा मलमपट्टी उपयोगाची नसते. जसे की, एखादा शेतकरी शेतातील गवत काढताना ते गवत आहे की हराळी हे बघतो. गवत खुरपून काढतो, पण हराळी काढण्यासाठी मात्र, ३ ते ४ फूट खांदावे लागते. आपल्या आजाराच्या बाबतीत मग आपण का मागे राहावे. आजार बळावल्याने तपासणी, उपचाराचा खर्च तर वाढतोच, पण आजार हाताबाहेर जाण्याची शक्यता असते.
श्वसनविकाराचे निदान करण्याचे आज नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. सर्दीपासून घोरण्यापर्यंत कोणत्याही विकारावर आपण मात करू शकतो. नवनवीन आणि किफायतशीर औषधोपचार आज उपलब्ध आहेत आणि अर्थात या सर्वांबरोबर गेल्या २८ वर्षांचा आमचा अनुभव, रुग्णांशी झालेला संवाद, इथल्या वातावरणाचा अभ्यास आणि त्याला आधुनिकतेची, नवीन वैद्यकीय ज्ञानाची आणि कौशल्याची दिलेली जोड रुग्णाला केवळ वेदनामुक्तच करत नाही, तर हसतमुख बनवते.
आमच्याकडे येणारे रुग्ण काहीवेळा सोबत ८ ते १० फायली घेऊन येतात आणि आमच्याकडील उपचाराच्या पहिल्या फेरीनंतर आम्ही आधीच ‘श्वास’मध्ये का आलो नाही, अशी खंत व्यक्त करतात. आमचे सांगणे एवढेच आहे की, श्वसनाचा काेणताही आजार अंगावर काढू नका, वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घ्या!