छपरी पलंगाचा वग! - कारण राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:48 PM2018-07-27T23:48:31+5:302018-07-27T23:51:30+5:30
महापालिका निवडणुकीचे चारच दिवस हातात राहिल्यानं ‘वाटपा’चं नियोजन चाललेलं, त्यात गुरुपौर्णिमेचा मुहूर्त. त्यामुळं तमाम गुरुमंडळींच्या मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी उसळलेली. यात इस्लामपूरकर साहेब आणि चंद्रकांतदादा आघाडीवर. कारण दोघांनी अनेकांना दीक्षा दिलीय.
साहेब आधीपासूनच, तर दादा गेल्या चार वर्षांपासून चर्चेत आलेले. साहेब टेक्नोसॅव्ही, हायटेक नेते, तर दादा साधा कॉलिंगचा मोबाईल वापरणारे. साहेबांचा पांढरा झब्बा-पायजमा, तर दादा नेहमीच काळी पँट आणि साध्या पांढऱ्या फूलशर्टमध्ये, त्यात तेलानं चोपून-चापून बसवलेले केस. कपाळावर उजव्या बाजूला एक वळणदार बट. दोघांच्याही चेहºयावर मंद हसू. (छद्मी की कुत्सित, असं काही नतद्रष्ट विचारतात.)
साहेबांचा झपाटा विलक्षण, अगदी चालणंही उंच्यापुºया देहयष्टीला साजेसं झपाझप, तर दादांचं मात्र संथगतीनं. दोघांची नजर मनाचा थांगपत्ता लागू न देणारी. स्टेजवर जाड भिंगाच्या चष्म्याआडून दादा कुठं आणि काय पाहत असतात, ते समजतही नाही! स्टेजवर साहेब मात्र मोबाईलमध्ये गुंतलेले. (खाली मुंडी पाताळ धुंडी, असंही काही हितचिंतक म्हणतात... आपण नाही लक्ष द्यायचं तिकडं.)
अलीकडं दादाही राजकारणातल्या ‘जुळण्या’ करण्यात तयार होताहेत. महापालिकेत कमळवाले ‘झिरोचे हिरो’ झाले, तर तो त्यांच्याच जुळणीचा परिणाम असेल. ७८ पैकी ३० उमेदवार त्यांनी इतरांकडून पळवून आणलेत! इस्लामपूरकर साहेबांची तर ‘जुळणी आणि कार्यक्रम’ यात मास्टरी. महापालिकेत दादांची सगळी मदार ‘मिरज पॅटर्न’वाल्यांवर, तर साहेब मात्र मिरज पॅटर्नला दणका देण्यास टपलेले. मागे इद्रिसभार्इंना त्यांनी महापौर केलं होतं, पण ठरलेली मुदत संपली तरी इद्रिसभार्इंनी खुर्ची सोडली नाही. साहेबांच्या विरोधातील हातवाल्यांच्या पाठिंब्यावर ते शेवटपर्यंत महापौर राहिले. साहेबांनी ठरवलं, की नंतरच्या टर्ममध्ये त्यांना महापालिकेत येऊ द्यायचं नाही. पाच वर्षं इद्रिसभार्इंना त्यांनी येऊही दिलं नाही. पण यंदा साहेब स्वत: पांढरं निशाण फडकवत इद्रिसभार्इंकडं गेले. बेरकीपणा म्हणतात, तो हाच!
यातून त्यांनी पक्षातलं ‘आऊटगोर्इंग’ थांबवून ‘इनकमिंग’ सुरू केलं. शिवाय इद्रिसभाई-किशोरदादा यांच्यात कुस्ती लावून दिली. विवेक कांबळे, सुरेश आवटी यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचं प्लॅनिंग केलं.आता सगळे गट फुटून प्रत्येकजण आपापली जागा शाबूत ठेवण्यासाठी पळू लागलेत. आवटी तर प्रत्यक्ष मैदानात नाहीत, पण त्यांच्या दोन्ही मुलांनाही घरी बसवण्याचा डाव आखला गेलाय. पाच मिनिटात पंचवीस ठराव मंजूर करण्याचे (त्यातले निम्मे ठराव पद्धतशीर ऐनवेळी घुसडलेले) अनोखे विक्रम मिरजकरांच्या नावावर नोंद आहेत! पक्षाला आणि नेत्यांना खिंडीत गाठायचं, वेगवेगळ्या पक्षात, गटात असलं तरी मलई चापायला मात्र सगळ्यांनी एकत्र यायचं, असले उद्योग करणाºयांना यंदा प्रभाग रचनेमुळं आणि साहेबांच्या खेळ्यांनी चाप लागण्याची चिन्हं आहेत.
...पण मिरज पॅटर्नमधल्या काही नेत्यांसाठी चंद्रकांतदादांनी आधीच ‘रेड कार्पेट’ टाकलंय. दादांना कसंही करून महापालिका जिंकायचीय. पुढचं पुढं, हा त्यांचा मूलमंत्र! दादांना अजून मिरज पॅटर्नचा अनुभव यायचाय. पण दादा म्हणे तसलं काही होऊच देणार नाहीत. ते स्वत: छडी घेऊन बसणारेत!
हातवाले-घड्याळवाल्यांच्या जाहीरनाम्याला अखेर गुरुवारचा मुहूर्त मिळाला. कराडचे पृथ्वीराजबाबा आणि साहेबांनी तो प्रकाशित केला. सोनसळचे आमदार बाळासाहेब, जयश्रीताई, सांगलीचे पृथ्वीराजबाबा, प्रतीकदादा, सुरेशअण्णा, बजाज कंपनी ही मंडळीही सोबत होती.
खरं तर या जाहीरनाम्याला ‘मागच्या पानावरून पुढं’, अशी कॅचलाईन द्यायला हवी! कारण त्यातले काही नमुनेच बघा : विश्रामबागला अंडरपास रस्ता, बाजारपेठेत व्हर्टिकल पार्किंगची व्यवस्था, तिन्ही शहरांत सुसज्ज भाजी मंडई, महावीरनगर येथे ट्रक पार्किंग, शहरालगत नवीन औद्योगिक वसाहत, विमानतळाची सुविधा, कुपवाडसाठी भुयारी गटार योजना, काळी खण आणि गणेश तलावाचा विकास, प्रत्येक प्रभागात आठवडा बाजार... काही आठवतंय का? मागील दोन्ही निवडणुकांत दोघांच्या जाहीरनाम्यांत हेच मुद्दे होते. घड्याळवाल्यांनी काढलेल्या महाआघाडीच्या जाहीरनाम्यांत तर आश्वासनांची खैरात केली होती. कवठेपिरानला विमानतळापासून सांगलीतल्या काळ्या खणीच्या सुशोभिकरणापर्यंत, सारं सारं होतं. विशेष म्हणजे महापालिका स्थापनेपासून महाआघाडीची पाच वर्षं सोडली तर हातवाल्यांचीच सत्ता आहे. पण वरचा एकही संकल्प तडीस गेलेला नाही. प्रत्येक जाहीरनामा ‘मागच्या पानावरून पुढं’, असाच!
जाता-जाता : हातवाले-घड्याळवाले आणि कमळवाले यांच्या जाहीरनाम्यांबद्दल एक इरसाल सांगलीकर म्हणतो, दोन्ही बाजूच्या जाहीरनाम्यांत सांगितलेलं कोण करणार, कसं करणार, कधी करणार, काही माहीत नाही. हा निव्वळ छपरी पलंगाचा वग! जो कोणी एका रात्रीत सात तळांची, सातमजली माडी बांधेल, त्याला राजकन्या वरमाला घालेल, अशी दवंडी त्या वगामध्ये दिली जाते. माडी काही कोणी बांधत नाही आणि राजकन्येचं लग्न काही होत नाही! दवंडी मात्र सुरू!!