रॅपिड अँटिजन चाचणीसाठी तब्बल ६०० रुपयांची आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:09+5:302021-05-11T04:28:09+5:30
सांगलीतील एका प्रयोगशाळेत कोरोनाच्या रॅपिड अँटिजन चाचणीसाठी ६०० रुपये आकारल्याचे या पावतीवरून दिसून येते. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...
सांगलीतील एका प्रयोगशाळेत कोरोनाच्या रॅपिड अँटिजन चाचणीसाठी ६०० रुपये आकारल्याचे या पावतीवरून दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या प्रत्येक खर्चासाठी शासनाने दर निश्चित केले असले तरी, नियमातून पळवाट काढत रुग्णांची लूट सुरूच आहे. प्रयोगशाळेत कोरोनाच्या रॅपिड अँटिजन चाचणीसाठी शासनाने १५० रुपये शुल्क निश्चित केले असताना, ६००-७०० रुपये आकारले जात आहेत. यावर प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नाही.
कोरोना उपचारांत रुग्णांची लूट होऊ नये, यासाठी शासनाने नियमावली व दरपत्रक जाहीर केले असले तरी, त्याला पद्धतशीर कोलदांडा देण्याचे काम रुग्णालये व प्रयोगशाळा करत आहेत. सजग नागरिकांनी तक्रारी केल्या तरच त्यामध्ये प्रशासन लक्ष घालत आहे.
कोरोनाच्या आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन चाचणीसाठी शासनाने दर निश्चित केले आहेत. रॅपिड अँटिजन चाचणीसाठी नागरिक स्वत: प्रयोगशाळेत आल्यास चाचणीसाठी १५० रुपये शुल्क आकारावे, असा शासनाचा आदेश आहे. सांगलीतील एका प्रयोगशाळेने २ मेरोजी या चाचणीसाठी ६०० रुपये घेतले आहेत. संबंधित नागरिकाला दराची माहिती नसल्याने त्याने पैसे भरले.
सांगली-मिरजेतील सर्रास प्रयोगशाळांत अशी लूट सुरू आहे. कोविड रुग्णालयांशी संलग्न प्रयोगशाळांत विविध चाचण्यांचा मारा होतो. त्यासाठी १५ ते २० हजार रुपयांनी रुग्णाचा खिसा हलका होतो. बाहेरील प्रयोगशाळांचे शुल्क याहून अधिक आहे. यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. तक्रार आली तरच चौकशी केली जाते, असा अनुभव आहे.