सांगलीत तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला : पूर्ववैमनस्यातून कृत्य -चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 08:49 PM2018-11-12T20:49:46+5:302018-11-12T20:50:53+5:30
सांगली : पूर्ववैमनस्यातून सांगलीतील वडर कॉलनीत महेश पांडुरंग शिंदे (वय २७) या तरुणावर कुºहाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी ...
सांगली : पूर्ववैमनस्यातून सांगलीतील वडर कॉलनीत महेश पांडुरंग शिंदे (वय २७) या तरुणावर कुºहाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेखर कलगुटगी, रमजान मोमीन, रवी पवार व विजय देवर्षी (सर्व रा. वडर कॉलनी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अजून कोणाला अटक करण्यात आली नाही. हल्ल्यात जखमी झालेल्या महेश शिंदे याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केल्याने त्याच्या प्रकृतीचा धोका टळला. रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांनी त्याचा जबाब घेऊन संशयितांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
जखमी महेश शिंदे व संशयित शेखर कलगुटगी यांच्यात रविवारी दुपारी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. दोघे एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले होते. कॉलनीतील लोकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील भांडण सोडविले होते. तरीही दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर शेखरने दुपारी झालेले भांडण मिटविण्यासाठी महेशला कॉलनीतील एका दुकानाजवळ बोलावून घेतले. महेश तिथे जाण्यापूर्वीच शेखरसह चारही संशयित उभा होते. महेशला पाहताच संशयितांनी शिवीगाळ केली. लाथा-बुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण केली. एकाने दुकानाजवळ ठेवलेली कुऱ्हाड घेऊन महेशच्या डोक्यात घातली. यामध्ये तो रक्ताच्या थारोळ्यात पडताच संशयित पळून गेले.
मटका की पूर्ववैमनस्य?
वडर कॉलनीतील एका मटकाबुकीच्या व्यवसायात महेश शिंदे हा अडथळा करीत होता. महेशचा या बुकीशी अनेकदा वादही झाला होता. यातून या बुकीमालकाने हल्ला करवून घेतला असल्याची चर्चा आहे. पोलीस मात्र पूर्ववैमनस्याचे कारण लावून तपास गुंडाळून मटकाबुकीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू आहे.