बिळूरमध्ये चाेरी; ३८ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:09+5:302020-12-06T04:28:09+5:30
जत : बिळूर (ता. जत) येथील जयश्री एचपी गॅस ग्रामीण वितरक कंपनीचे गोडावून व कार्यालय फोडून ३७ हजार ८५० ...
जत : बिळूर (ता. जत) येथील जयश्री एचपी गॅस ग्रामीण वितरक कंपनीचे गोडावून व कार्यालय फोडून ३७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या आरोपावरून शिवाजी प्रल्हाद चव्हाण (वय २८. रा. उमराणी रोड, पारधी तांडा, जत) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चारजणांची नावे निष्पन्न झाली असून, इतर तीनजण फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जयश्री एचपी गॅस कंपनीचे बिळूर येथे गोडावून व कार्यालय आहे. ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री चार चोरट्यांनी गाेदाम फोडून सुरक्षा पाईप, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, एच पी कंपनीचे १४ किलो वजनाचे दोन सिलिंडर व रोख ४ हजार रुपये असा सुमारे ३७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. खबऱ्याकडून चोरट्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, केरुबा चव्हाण, रामेश्वर पाटील, आगतराव मासाळ, सचिन हाक्के, वहिदा मुजावर यांनी उमराणी रोड येथे छापा टाकून शिवाजी चव्हाण यास अटक केली. इतर तिघेजण पोलीस असल्याची चाहूल लागताच पसार झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन हाक्के करत आहेत.