कळंबीत माजी सरपंचाच्या घरातील १२ तोळे दागिन्यांवर चाेरट्याचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:23+5:302021-06-11T04:19:23+5:30
मिरज : कळंबी (ता. मिरज) येथे माजी सरपंच बाळासाहेब दादासाहेब पाटील यांच्या घरात मुलाच्या विवाहाची लगबग सुरू असताना ...
मिरज : कळंबी (ता. मिरज) येथे माजी सरपंच बाळासाहेब दादासाहेब पाटील यांच्या घरात मुलाच्या विवाहाची लगबग सुरू असताना अज्ञाताने सहा लाख रुपये किमतीचे १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
बाळासाहेब पाटील यांच्या मुलाचे दि. ६ रोजी कळंबी येथे लग्न होते. त्यापूर्वी दि. ५ रोजी देवीची ओटी भरण्याचा व हळदीचा कार्यक्रम होता. विवाहासाठी त्यांचा पुणे येथील मोठा मुलगा, सून घरी आले होते. देव पूजन कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी पाटील यांच्या सुनेने १२ तोळे सोन्याचे दागिने, एका पिशवीत घालून खोलीत टेबलावर ठेवले होते. दुसऱ्या दिवशी लग्न असल्याने घरातील सर्व जण गडबडीत होते. याचा फायदा घेत चोरट्याने पाटील यांच्या सुनेच्या दागिन्याची पिशवी हातोहात लंपास केली. सायंकाळी दागिन्यांची पिशवी व दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्याने पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पाटील यांच्या सर्व कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, सोन्याचे दागिने सापडले नसल्याने मुलाचा विवाह झाल्यानंतर पाटील यांनी दागिने चोरीबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. बारा तोळे सोन्याचे दागिने चोरीबाबत ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी लग्नासाठी घरात वावरणाऱ्या एका गावातील एका संशयितास चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती.