चर्मकार समाजाचा गलेफ अर्पण
By admin | Published: May 25, 2014 12:44 AM2014-05-25T00:44:21+5:302014-05-25T00:47:46+5:30
भाविकांची गर्दी : मीरासाहेब दर्गा उरूसास प्रारंभ, आजपासून रंगणार संगीत महोत्सव
मिरज : मिरजेतील प्रसिध्द मीरासाहेब दर्ग्याच्या उरूसास आज शनिवारपासून सुरुवात झाली. पहाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला. रविवारी गंधलेप विधी व संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस प्रारंभ होणार आहे. मीरासाहेब दर्ग्याचा ६३९ व्या उरूसास आज सुरुवात झाली. पहाटे सहा वाजता मानकर्यांच्या हस्ते चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला. काँगे्रस नेते अॅड. सी. आर. सांगलीकर, दयाधन सोनवणे, सिध्दार्थ जाधव आदी उपस्थित होते. गलेफ अर्पण कार्यक्रमावेळी दर्ग्यात हिंदू-मुस्लिम भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गलेफसमोर शाहिरांनी कला सादर केली. त्यानंतर महिलांनी गलेफ अर्पण केला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सकाळी पोलीस दलाचा व दुपारी महापालिकेतर्फे गलेफ अर्पण करण्यात आला. रविवारी उरूसाच्या दुसर्यादिवशी गुलबर्गा येथील सुफी संत अफसरबाबा व मुस्तफाबाबा यांच्या हस्ते गंधलेप विधी होणार आहे. सकाळी दहा वाजता दर्गा पटांगणातील चिंचेच्या झाडाखाली संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस प्रारंभ होणार आहे. पहिल्यादिवशी किराणा घराण्यातील दिग्गज आपली संगीत सेवा अर्पण करणार आहेत. उरूसाच्या पहिल्यादिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. (वार्ताहर)