कर्नाटकमधून स्वस्त पेट्रोल, डिझेलची महाराष्ट्रामध्ये तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 03:21 PM2021-11-21T15:21:03+5:302021-11-21T15:22:17+5:30
संतोष भिसे सांगली : कर्नाटकातील स्वस्त तेलाची महाराष्ट्रात तस्करी सुरू झाली आहे. कर्नाटकातून आणायचे आणि अल्प नफ्यात महाराष्ट्रात विकायचे, ...
संतोष भिसे
सांगली : कर्नाटकातील स्वस्त तेलाची महाराष्ट्रात तस्करी सुरू झाली आहे. कर्नाटकातून आणायचे आणि अल्प नफ्यात महाराष्ट्रात विकायचे, असा नवाच व्यवसाय जन्माला आला आहे. महाराष्ट्रातील सीमावर्ती गावांत सध्या हा प्रकार जोरात सुरू आहे.
कर्नाटकात पेट्रोल ९.५० रुपयांनी, तर डिझेल ७.७० रुपयांनी स्वस्त आहे. केंद्राच्या निर्णयानंतरही महाराष्ट्राने करकपात केली नाही, त्याचा मोठा फटका सीमा भागातील पंपांना बसला आहे. मिरज, जत, कवठेमहांकाळ तालुक्यांत सुमारे ४० पंप सीमेवरील गावांत आहेत. तेथील विक्री पूर्णत: थंडावली आहे. १ नोव्हेंबरला घेतलेले तेल अजूनही संपलेले नाही. अवघ्या चार-पाच किलोमीटर पलीकडे कर्नाटकात तेल स्वस्त मिळू लागल्याने वाहने तेथे धाव घेताहेत. तेलाची तस्करीही सुरू झाली आहे. कर्नाटकातील पंपावरून तेल आणून महाराष्ट्रात विकायचे असा प्रकार सुरू आहे. विशेषत: शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. आठवड्यातून एक टेम्पो कॅन घेऊन खास तेल आणण्यासाठी कर्नाटकातील गावात जातो.
पेट्रोलपेक्षा डिझेलची तस्करी जास्त आहे. लिटरमागे साडेसात रुपयांची बचत होते. कर्नाटकातून आणलेले स्वस्त डिझेल दोन-तीन रुपये नफ्यासह महाराष्ट्रात विकले जाते. कर्नाटकात फक्त तेलासाठी जाणे शक्य नसलेले ग्राहक ते खरेदी करत आहेत. यामुळे सीमावर्ती पंपचालकांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. सीमा भागातील रहिवासी दररोजच गावातील पंप सोडून कर्नाटकात धाव घेत आहेत. कर्नाटकातील पंपांवर ‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’ असे फलक लागले आहेत.
कोऱ्या बिलांना मागणी वाढली
कर्नाटक व महाराष्ट्रातील दरामधील फरकाचा वेगळाच अनुभव पंपचालकांना येत आहे. चालक कर्नाटकात स्वस्त डिझेल भरतात. महाराष्ट्रात येऊन पंपावरील कर्मचाऱ्यांकडून महाग डिझेलच्या बिलाची पावती घेतात. कर्मचारीही १००-२०० रुपयांच्या चिरीमिरीसाठी पावती देऊन टाकतात. याद्वारे चालकाला पाचशे-हजाराची वरकमाई होते.
असा आहे फरक
अथणीमध्ये पेट्रोल १००.३३ रुपये, तर डिझेल ८४.७९ रुपये
सांगलीत पेट्रोल १०९.६९ रुपये, तर डिझेल ९२.५१ रुपये
सीमा भागातील पंपांची विक्री अवघ्या १० टक्क्यांवर आली आहे. महाराष्ट्रातील ग्राहक कर्नाटकात जाऊन तेल भरत आहेत. किमतीतील फरकामुळे पंप चालकांना लाखोंचे नुकसान सोसावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने योग्य निर्णय घेतला नाही, तर सीमा भागातील पंप चालकांना पंप बंद करण्याची वेळ येईल. -सुरेश पाटील, पेट्रोल- डिझेल डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन