सांगलीत पॉलिशच्या बहाण्याने चक्क सोने वितळवून फसवले
By घनशाम नवाथे | Published: August 17, 2024 07:26 PM2024-08-17T19:26:14+5:302024-08-17T19:26:33+5:30
साडेपाच तोळ्यांपैकी निम्मेच सोने शिल्लक
सांगली : येथील पंचशीलनगरमध्ये भामट्यांनी पॉलिशच्या बहाण्यानंतर फसवताना पकडले जाऊ नये म्हणून चक्क निम्मे सोनेच वितळवून घेऊन पलायन केल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर साडेपाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्यांमधून पावणेतीन तोळेच बांगड्या शिल्लक राहिल्या. वजनातील घट पाहून वंदना नामदेव मोहिते (वय ५८, रा. भिसे प्लॉट, पंचशीलनगर) यांना फसवल्याचे लक्षात येताच त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अधिक माहिती अशी, सोने पॉलिशच्या बहाण्याने घरासमोर येणारे भामटे रंगीत पाण्यामध्ये सोने ठेवल्याचे सांगून पळून जातात. थोड्या वेळाने सोने बाहेर काढण्यास सांगितल्यामुळे नंतर रंगीत पाण्यात बघितल्यानंतर हातचलाखीने सोने लंपास केल्याचे निदर्शनास येते. बऱ्याच जणांना हा फसवणुकीचा फंडा माहीत झाला आहे. त्यामुळे चोरट्यांनी फसवण्याची नवीनच शक्कल लढवल्याचा प्रकार पंचशीलनगरमधील घटनेतून उघड झाला.
पंचशीलनगर येथील वंदना मोहिते या दि. १६ रोजी सकाळी ११:३० वाजता घरात होत्या. तेव्हा भामटे त्यांच्या दारात आले. त्यांनी सोने पॉलिश करून देतो, अशी त्यांना भुरळ घातली. मोहिते यांनी त्यांच्याकडील साडेपाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या दोघांकडे दिल्या. दोघांनी वेगवेगळ्या प्रक्रिया करत असल्याचे त्यांना भासवले. या प्रकारात त्यांनी ‘लिक्विड’ तापवून सोन्याच्या बांगड्यांतील निम्मा भाग वितळवून घेतला. काही वेळाने चकाचक सोन्याच्या बांगड्या मोहिते यांच्या हातात देऊन भामट्यांनी काढता पाय घेतला.
मोहिते यांनी हातात बांगड्या घेऊन पाहताना त्या वजनाला हलक्या लागल्या. निरखून पाहिल्यानंतर चार बांगड्या पातळ होऊन तुटल्या. तेव्हा त्यांना चोरट्यांनी सोन्याचा अंश वितळवून घेतल्याचे समजले. त्यांनी तातडीने बाहेर जाऊन पाहणी केली; परंतु चोरटे केव्हाच पसार झाले होते. त्यांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठून ९० हजारांचे सोने वितळवून घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद नोंदवली. दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चोरट्यांची नवी ‘मोडस’
पॉलिशच्या बहाण्याने सगळेच सोने घेऊन पलायन करणे धोक्याचे असते; त्यामुळे सोन्याचा थोडा अंश घेऊन फसवण्याचा नवा फंडा भामट्यांनी शोधला आहे. ही गुन्हे करण्याची नवी ‘मोडस’ असल्याचे पोलिसांनी सांगितले.