लिंगायत समाजाची भाजप सरकारकडून फसवणूक : विश्वनाथ मिरजकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:24 PM2019-03-16T16:24:23+5:302019-03-16T16:25:44+5:30
लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. मात्र मागील पाच वर्षात भाजपकडून समाजाची फसवणूक झाली असून समाजाचा प्रश्न सोडविला नसल्याची टीका समाजाचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजातील लोकांनी विचार करून मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सांगली : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. मात्र मागील पाच वर्षात भाजपकडून समाजाची फसवणूक झाली असून समाजाचा प्रश्न सोडविला नसल्याची टीका समाजाचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजातील लोकांनी विचार करून मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सांगलीमध्ये लिंगायत समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज्य नेते वसंतराव नगरकर आणि विश्वनाथ मिरजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून आगामी निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली.
लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबत मागील काही वर्षांपासून मागणी केली जात आहे. त्यासाठी समाजाची चळवळ गेल्या सहा महिन्यात तीव्र करण्यात आली होती. केवळ आरक्षण नको असून राजकीय आरक्षण हवे आहे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. आरक्षणासाठी सरकारविरोधात आंदोलन केले.
हिंदू लिंगायत मधील पोट जातींवर अन्याय होत असून त्यांना आरक्षण मिळत नाही. मात्र सरकारकडून अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे समाजाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गत आठवड्यात समाजातील एका गटाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते, परंतु निवडणुकीवर बहिष्कार करणे हा पोरकटपणा आहे. त्यामुळे समाजाने निवडणुकीवर बहिष्कार घालू नये. मात्र कोणाला मतदान करायचे हे समाजातील लोकांनी ठरवावे, असे आवाहन मिरजकर यांनी केले.
नाक दाबून धरल्याशिवाय तोड उघडणार नाही. राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघातील निकाल बदलण्याची ताकद लिंगायत समाजामध्ये आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज सरकारला आहे. समाजाला कुणी बाजूला ठेवू नये. आरक्षण मिळेपर्यंत लढाई चालू ठेवली जाईल.
विधानसभा निवडणुकीपर्यंत धरणे, निदर्शने, मोर्चा अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करू, अन्यथा समाजाची ताकद त्या निवडणुकीत दाखवून देण्यात येईल, असा इशाराही यावेळी मिरजकर यांनी दिला.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी- पाटील, डॉ. रवींद्र आरळी, प्रदीप वाले, नगरसेवक राजेंद्र कुंभार, मनोहर कुरणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आरळी यांच्याकडे नेतृत्व
डॉ. रवींद्र आरळी यांच्याकडे समाजाचे नेतृत्व लिंगायत समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी जतमधील डॉ. रवींद्र आरळी यांच्याकडे समाजाचे नेतृत्व देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे. समाजाची ताकद ही महत्वाचे आहे. मात्र स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात चालढकल केली जात असल्याचे स्पष्ट झाले. आहे. मात्र संपूर्ण समाज एकत्र करून समाजाची ताकद दाखवून देण्यात येईल, असेही डॉ आरळी यांनी स्पष्ट केले.