Sangli Crime: खोटे लग्न लावून देत नवरदेवाला घातला दोन लाखांचा गंडा, पाच जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 12:34 PM2023-06-03T12:34:18+5:302023-06-03T12:34:41+5:30
विवाहाच्या दुसऱ्याच दिवशीच संधी साधून घरातून धूम ठोकली
विटा : पलूस येथील नवरदेवाला २ लाख ५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी नवरदेव हरीश मोहन जाधव (वय ३३,मूळगाव सांगलीवाडी,सध्या रा. पलूस, जि. सांगली) याने दिलेल्या तक्रारीनुसार वधू संगीता कृष्णा चव्हाण (रा. पालघर), एजंट वर्षा बजरंग जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर), बंडू पुंडलिक साळुंखे, बजरंग गणपती साळुंखे व राजू आप्पू घारगे (सर्व रा. मंगसुळी, ता. अथणी, जि. बेळगाव) या पाच ठकसेनाविरुद्ध विटा पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सांगलीवाडी येथील हरिश जाधव हे कुटुंबीयांसह पलूस येथे राहण्यास आहेत. त्यांचे मंगसुळी (कर्नाटक) येथे नातेवाईक आहेत. वडील मोहन मंगसुळीला गेल्यानंतर त्यांनी नातेवाईक बंडू पुंडलिक साळुंखे यांना हरिशसाठी स्थळ पाहण्यास सांगितले. बंडू साळुंखे याने मुलगी असल्याचे सांगून सुलतानगादेतील एजंट वर्षा जाधव हिच्याशी संपर्क केला. वर्षाने पालघर येथील संगीता चव्हाण हिचे स्थळ सुचविले. बंडू साळुंखे, बजरंग साळुंखे व राजू आप्पू घारगे यांच्या मध्यस्थीने २ लाख ५ हजार रुपये देण्याच्या बोलीवर विवाह ठरला.
त्यानंतर हरिश व मोहन जाधव यांनी वर्षा हिच्याकडे रोख ४५ हजार रुपये दिले. त्यानंतर पलूस येथे १ लाख ६० हजार असे एकूण २ लाख ५ रुपये दिले. रक्कम हातात मिळाल्यानंतर १६ ऑगस्ट २०२२ रोजी हरिशचा संगीता चव्हाण हिच्याशी विवाह लावून दिला. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या आजीचे सांगलीवाडी येथे निधन झाल्याने वधू संगीता सोडून सर्वजण पलूसहून सांगलीवाडीला गेले. ही संधी साधून संगीता हिने घरातून धूम ठोकली.
काही वेळाने हरिशचे नातेवाईक सांगलीवाडीहून पलूसला आल्यानंतर संगीता घरी नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शोध घेतला असता ती किर्लोस्करवाडी रेल्वेस्थानकावर सापडली. त्याचक्षणी त्यांनी संगीताला एजंट वर्षा हिच्या स्वाधीन केले. हरिश व त्यांच्या वडिलांनी हरिशचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून द्या किंवा दिलेले दोन लाख पाच हजार रुपये परत द्या, असा तगादा वर्षाकडे लावला.
वर्षाने पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरिशने खोटे लग्न लावून देत आपली २ लाख ५ हजाराची फसवणूक केल्याची फिर्याद दिल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.