राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या संघटनकौशल्याची चाचपणी
By admin | Published: December 1, 2015 11:09 PM2015-12-01T23:09:58+5:302015-12-02T00:40:09+5:30
निमित्त अमृतमहोत्सवाचे : जयंत पाटील यांनी दिल्या टिप्स्
सांगली : राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या संघटनकौशल्याची चाचपणी सुरू झाली आहे. २0 रोजी होणाऱ्या पुण्यातील अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांना संघटित करून घेऊन येण्याच्या सूचना देतानाच, यातून पक्षीय ताकद वाढविण्याची संधी पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे मत आ. जयंत पाटील यांनी यावेळी मांडले.
सांगलीतील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात अमृतमहोत्सवी कार्यक्रम तसेच जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या ताकदीची चाचपणीही केली. प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून कार्यक्रमांचे नियोजन आणि लोकांचे संघटन याविषयीची मते जाणून घेतली. पदाधिकारी कितपत तयारी करू शकतात, याचा अंदाज त्यांनी घेतला. पक्षाचे जिल्ह्यातील दहा तालुकाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडी आणि सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना त्यांनी, लोकांना पुण्यातील कार्यक्रमासाठी एकत्रित आणण्याची सूचना दिली. पक्षीय कार्यक्रम असला तरी यानिमित्ताने लोकांशी जोडण्याची व संघटनकौशल्य पणास लावण्याची संधी पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील दहा हजार लोक पुण्यातील कार्यक्रमाला जाण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.
बैठकीस आ. सुमनताई पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, सुरेश पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, वैभव शिंदे, शरद लाड, लीलाताई जाधव, बाबासाहेब मुळीक, बी. के. पाटील, ताजुद्दीन तांबोळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)