पालिका क्षेत्रातील २४ कोटींच्या रस्त्यांची गुणवत्ता त्वरित तपासा : शेखर माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:20 PM2018-02-22T23:20:19+5:302018-02-22T23:20:27+5:30
मिरज : महापालिकाक्षेत्रातील रस्ते कामात गैरव्यवहार झाला असून, सुमारे २४ कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या ३५ रस्त्यांची कºहाड अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत गुणवत्ता व दर्जा तपासणी होणार आहे. एका सत्ताधारी आमदाराचा स्वीयसहायक महापालिका क्षेत्रातील रस्ते कामाचा ठेकेदार असून, रस्ते कामातील गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी न्यायालयाकडे कोर्ट कमिशन नियुक्तीची मागणी करणार असल्याचे नगरसेवक शेखर माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते अत्यंत खराब झाल्याने नगरसेवकांच्या पाठपुराव्याने सुमारे २४ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना सुरुवात झाली. त्यातील काही रस्ते पूर्ण झाले असून, मिरज शहरातील सुमारे ३ कोटी ३९ लाख ४० हजार सातशे, सांगलीतील १५ कोटी ८ लाख ६६ हजार सहाशे, कुपवाडमधील ४ कोटी १६ लाख ३ हजार नऊशे रुपये खर्चाच्या रस्ते कामाचा समावेश आहे. रस्ते कामाच्या दर्जाबाबत सांगली-मिरज-कुपवाड शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. यासाठी आयुक्तांना मिरज येथील वंटमुरे कॉर्नर ते डॉ. आंबेडकर पुतळा ते हिरा हॉटेल या रस्त्याची तपासणी केली असता, हा रस्ता व मिरज शहरातील इतर रस्ते दर्जाहीन व कमी जाडीचे केले असल्याने या रस्त्यांच्या दर्जाची तपासणीची मागणी केली होती. ठेकेदार, अधिकारी व नागरिकांसमवेत रस्ता दर्जा तपासणी केल्यानंतर रस्त्याची जाडी व वापरलेले साहित्य निकृष्ट असल्याचे आढळले आहे.
याबाबत आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडे सर्वच रस्ते कºहाड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी करावी, अशी मागणी केली होती. या मागणीप्रमाणे आयुक्तांनी रस्ते दर्जा तपासणीसाठी कºहाड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सुमारे २४ कोटी रुपयांच्या ३५ रस्त्यांचे आॅडिट व दर्जा तपासणी होणार आहे. शासन निधीतून ३३ कोटी रुपये खर्चाचे रस्त्याचे काम पूर्ण होताच त्याही रस्त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. रस्ते ठेकेदारांकडे कोअर कटिंग यंत्र बंधनकारक होते. मात्र, कोअर कटिंग यंत्र नाही. रस्त्याकरिता खडी व डांबराचे प्रमाण कमी असल्याने रस्ता दर्जाहीन होत, असल्याचा आरोप माने यांनी केला. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, नगरसेविका अश्विनी कांबळे, शिवसेना शहरप्रमुख विशालसिंग रजपूत, उपशहर प्रमुख दीपक पाटील, प्रदीप कांबळे, ऋषिकेश पाटील उपस्थित होते.
आमदाराचा स्वीय सहाय्यक ठेकेदार
एका सत्ताधारी आमदाराचा स्वीयसहायक महापालिका क्षेत्रातील रस्ते कामाचा ठेकेदार असल्याचा आरोप शेखर माने यांनी केला. रस्ते ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने बोगसगिरी सुरू असून, रस्ते ठेकेदार ‘लॉबी’ बळकट आहे. त्यांचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत आहे. तिन्ही शहरातील एकूण ३५ रस्त्यांपैकी सांगली- २१, मिरज- ८ आणि कुपवाड ६ अशा रस्त्यांची तपासणी होणार आहे. गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी न्यायालयाकडे कोर्ट कमिशन नियुक्तीचीही मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.