सहकारी संस्थांच्या संचालकांची भूमिका तपासावी
By Admin | Published: January 22, 2016 12:14 AM2016-01-22T00:14:18+5:302016-01-22T00:50:07+5:30
विजयसिंह मोहिते-पाटील : ‘सहकारतपस्वी गुलाबराव पाटील’ पुरस्काराने सन्मान
सांगली : बरखास्त किंवा अडचणीतील सहकारी संस्थांच्या संचालकांवर कारवाई करण्यापूर्वी, निर्णयांमागील त्यांची भूमिका तपासायला हवी. कोणत्या उद्देशाने निर्णय घेतले गेले, याचाही शोध घेतला पाहिजे. सरसकट कारवाईचा निर्णय योग्य नाही, असे मत माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी गुरुवारी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आ. जयंत पाटील, पतंगराव कदम यांच्याहस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बँकेमार्फत पुरस्कार प्रदान सोहळाही त्यांच्याहस्ते पार पडला. यावेळी मोहिते-पाटील बोलत होते.
ते म्हणाले की, सहकारी चळवळीची सक्षम जडणघडण सांगली जिल्ह्यात झाली. अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान या चळवळीला लाभले. सांगलीसह सातारा जिल्ह्यातही सहकारी संस्था भक्कमपणे उभ्या राहिल्या. या दोन्ही जिल्ह्यांनी सहकारात राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. सहकारी संस्थांच्या बरखास्त मंडळाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. कोणतीही कारवाई करताना किंवा धोरण ठरविताना सहकारी संस्थांच्या संचालकांना सरसकट दोषी धरणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
आ. पतंगराव कदम म्हणाले की, देशातील एकूण सहकारापैकी पन्नास टक्के सहकार महाराष्ट्रातच आहे. संस्था उभारण्यासाठी आणि त्या टिकविण्यासाठी पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी खर्ची घालण्यात आला आहे. संस्था मोडीत काढायला वेळ लागत नाही. कोणताही निर्णय घेताना ही सहकार चळवळ टिकली पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. नव्याने कायदे करण्याची गरज नाही.
जयंत पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेतील संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नि:स्पृहपणे काम केले पाहिजे. जिल्हा बँक आणि राज्य बँकेच्या माध्यमातून गुलाबराव पाटील यांनी सहकाराला एक वेगळी दिशा दिली. त्याच जोरावर या संस्था अधिक सक्षम झाल्या. सांगली जिल्हा बँकेने आता सातारा जिल्हा बँकेशी स्पर्धा करून त्यांच्या बरोबरीला जाण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बाजीराव (नाना) पाटील यांना ट्रस्टच्यावतीने ‘गुलाबराव पाटील ऋणानुबंध’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनीही मनोगत व्यक्त केले. ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत, तर बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, संचालक डी. के. पाटील, विक्रम सावंत, बॅँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
माजी सहकारमंत्री म्हणा..!
विजयसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी ‘जिल्ह्यातील सहकार आणि सहकारावरील नेत्यांचे प्रेम’ या विषयावर मत मांडले. सूत्रसंचालन करणाऱ्याने पतंगरावांचा उल्लेख माजी वनमंत्री असा केल्यानंतर पतंगरावांनी त्यांना माजी सहकारमंत्री असा उल्लेख करण्याची सूचना दिली. यावरून येथील नेत्यांचे सहकारावरील प्रेम दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
पूर्वी जिल्हा बॅँकेची इमारत छोटी होती. त्यावेळी या बॅँकेत फारसा राजकीय संघर्ष नव्हता. नवीन मोठी इमारत झाली आणि याठिकाणचा लोकांचा इंटरेस्ट वाढला, असे मत जयंतरावांनी व्यक्त केले.
नापासांचाही सत्कार करा!
जिल्ह्यातील चांगल्या सोसायट्या, सचिव आणि शाखांचा गौरव करताना, प्रगतीच्या पातळीवर सर्वात शेवट असणाऱ्या संस्थांचाही पुढील वर्षापासून गौरव करावा. त्यांना मागे राहण्याची त्यामुळे भीती राहील, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांत हशा पिकला.