पाचवड ते काेकरूड मार्गावरील वृक्षताेडीची चाैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:17+5:302021-03-09T04:29:17+5:30
कोकरूड : पाचवड (कराड) ते कोकरूड या राज्य मार्गावरील वृक्षतोडीबाबत ठेकेदार आणि स्थानिक प्रशासन यांनी मिळून शासनाची मोठी फसवणूक ...
कोकरूड : पाचवड (कराड) ते कोकरूड या राज्य मार्गावरील वृक्षतोडीबाबत ठेकेदार आणि स्थानिक प्रशासन यांनी मिळून शासनाची मोठी फसवणूक केली असून, या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेना राज्य विस्तारक किरण सावंत यांनी निवेदनाद्वारे वनक्षेत्रपाल शिराळा यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यमार्ग क्र. १४४च्या पाचवड (कराड) ते कोकरूड या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली सर्व झाडे तोडण्यात आली असून, यामध्ये रस्त्याच्या मापाव्यतिरिक्तही झाडांची कत्तल करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी याचा जाब विचारल्यास ठेकेदाराकडून दमदाटी करण्यात येत आहे. निसर्गप्रेमींनीही मोठ्या प्रमाणावर याबाबत आवाज उठवला, पण स्थानिक प्रशासन त्यास दाद देत नाही. चार हजारांहून अधिक झाडांची कत्तल झाली असताना फक्त नऊशे झाडे तोडल्याचे रेकॉर्ड ठेवले आहे. एक झाड तोडल्यास पाच झाडे पुन्हा लावणे बंधनकारक आहे, पण तसे अद्याप झालेले नाही.
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जेसीबी घालून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. त्याची पूर्वसूचना व नुकसानभरपाईही देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांचे अगोदरच महापूर व अवकाळी पावसाने कंबरडे मोडले असताना आता हे नवीन संकट उभे राहिले आहे. ठेकेदार व स्थानिक प्रशासन मिळून शासनाची फसवणूक करत असून, या कामाची सखोल चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी व चौकशी होईपर्यंत या कामास स्थगिती मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.