रासायनिक खताचे भाव गगनाला भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:50+5:302021-03-28T04:24:50+5:30
सांगली : हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत. वाहतूक खर्च वाढल्याच्या नावाखाली रासायनिक खताचे दर पोत्याला तब्बल ...
सांगली : हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत. वाहतूक खर्च वाढल्याच्या नावाखाली रासायनिक खताचे दर पोत्याला तब्बल १०० ते ५० रुपयाने वाढवले आहेत. आतापर्यंत दोन कंपन्यांनी खताचे दर वाढवले आहेत. दिनांक १ एप्रिलपासून ड्रीपद्वारे देणाऱ्या खतांच्या किमतीही वाढणार आहेत, असे संकेत खत विक्रेत्यांनी दिले आहेत. कोरोना काळात आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांचे खत दरवाढीमुळे कंबरडे मोडणार आहे.
खरीप हंगाम अवघ्या अडीच महिन्यांवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहेत. जिल्ह्यात खरिपाची पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील नांगरणीसह अन्य मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. दुकानदारांनीही खते व बी-बियाण्याची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे. ऊस पट्ट्यात शेतकरी अमोनियम सल्फेट, डीएपी, युरिया या खतांचा जास्त वापर करत आहेत. एका कंपनीचा २०१९-२०मध्ये १०:२६:२६ खताचा दर एक हजार २०० रुपये होता, तो ५० रुपयाने वाढवून एक हजार २५० रुपये केला आहे. या कंपनीच्या १२:३२:१६ या खताचा जुना दर एक हजार १८६ रुपये होता, तो दर २४ रुपये वाढवून एक हजार २१० रुपये केला आहे. पोटॅश (एमओपी) खताचा जुना दर ८५० रुपये होता, हा दर १०० रुपयाने वाढून ९५० रुपये झाला आहे. डीएपीचा जुना दर एक हजार २०० रुपये होता, यामध्ये १०० रुपयाने वाढ होऊन एक हजार ३०० रुपये झाला आहे.
चौकट
शेती अवजारांचे दर ५ ते १० टक्केंनी वाढले
कंपनीनुसार ट्रॅक्टर आणि त्यांच्या शेती अवजारांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये सरासरी ४ ते ५ टक्के वाढ झाली आहे तसेच शेती अवजारांमध्ये १० टक्केपर्यंत वाढ झाली आहे. या दरात वाढ ही केवळ वाहतूक खर्च वाढल्यामुळे झाली आहे, अशी प्रतिक्रिया युनर्वस ट्रॅक्टरचे संचालक शरद सोनार यांनी दिली.
चौकट
दरवर्षी शेतीचा खर्च वाढत आहे. शेतमालाला मिळणारे भाव मात्र कमी असतात. नैसर्गिक संकटांमुळे कोणतेही पीक पूर्णपणे हाती येत नाही. यामुळे शेती कसणे कठीण झाले आहे. त्यातच खतांचा आणि आंतर मशागतीचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्याचे जीवन कठीण झाले आहे.
- बाळासाहेब लिंबीकाई, शेतकरी, नरवाड.
चौकट
रासायनिक खतांचे दर
खताचे नाव २०१९-२० २०२०-२१
१०:२६:२६ १२०० १२५०
१२:३२:१६ ११८६ १२१०
डीएपी १२०० १३००
एमओपी ८५० ९५०
१५:१५:१५ १००० १०६०