इस्लामपूरमध्ये १९ डिसेम्बरपासून छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:24 PM2018-12-03T13:24:57+5:302018-12-03T13:34:21+5:30
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या संयोजनाचा मान इस्लामपूर नगरीला मिळाला असून, दि.१९ ते २३ डिसेम्बर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या संयोजनाचा मान इस्लामपूर नगरीला मिळाला असून, दि.१९ ते २३ डिसेम्बर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धा चांगल्या पद्धतीने व्हाव्यात, तसेच खेळाडू, पंच पदाधिकारी यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, यासाठी क्रीडा विभागासह संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी, असे निर्देश कृषी, पणन, फलोत्पादन तथा पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. इस्लामपूर येथे वाळवा पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात स्पर्धेच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ घोडके आदि उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कबड्डी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून इस्लामपूर नगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे, असे स्पष्ट करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
या स्पर्धा जयंत पाटील खुले नाट्यगृह, उरुण इस्लामपूर येथे होणार आहेत. या स्पर्धेत १६ महिला व १६ पुरुष असे ३२ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये दोन्ही संघाचे ३८४ स्पर्धक, ३२ संघ व्यवस्थापक आणि ५० पंच सहभागी होणार आहेत. १९ डिसेंबरला नावनोंदणी होणार आहे. २० डिसेम्बरला सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते क्रीडांगण पूजनाने स्पर्धा सुरु होतील. २३ रोजी समारोप होईल.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, या स्पर्धा मॅटवर होणार आहेत. साखळी पद्धतीने पुरुष व महिलांचे प्रत्येकी २४ आणि आणि बाद पद्धतीने प्रत्येकी ७ सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी खेळाडू, कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, स्थनिक अधिकारी असे जवळपास ७०० लोक येतील.
या पार्श्वभूमीवर आयोजन, स्वागत, उदघाटन समिती, तांत्रीक, तक्रार निवारण, मानधन, बक्षीस वितरण, प्रमाणपत्र क्रीडांगण, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था अशा १८ समित्यांचे गठन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे, निमंत्रित तसेच
पंच आणि अधिकारी यांच्यासाठी प्रत्येकी एक अशा तीन व्यासपीठांची व्यवस्था असणार आहे.
१ ५ ते २० हजार प्रेक्षकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार जयंतराव पाटील, आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह उपस्थितांनी मौलिक सूचना केल्या.
या बैठकीत स्पर्धक, संघ व्यवस्थापक, पंच, कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांची निवासव्यवस्था, भोजन व्यवस्था, क्रीडांगण व्यवस्था, खेळाडूंसाठी स्वच्छतागृह, वैद्यकीय व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, पाणी व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी, बॅरिकेडिंग, स्टेज, माईक व्यवस्था, चषकाची प्रतिकृती, अन्य तांत्रिक बाबी, स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन आदि बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दिनकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माणिक वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र घाडगे यांनी केले. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, इस्लामपूर नगरपालिका मुख्याधिकारी दीपक झिंजाड, क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पोपटराव पाटील, राष्ट्रीय खेळाडू सचिन भोसले, क्रीडा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, व कबड्डी असोसिएशनचे प्रतिनिधी व नियोजनाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.