मंजूर विकास आराखड्याप्रमाणे छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:46+5:302021-06-06T04:19:46+5:30
मिरज : मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता मंजूर विकास आराखड्याप्रमाणेच करण्याची मागणी सुधार समितीने केली आहे. या रस्त्यासाठी ...
मिरज : मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता मंजूर विकास आराखड्याप्रमाणेच करण्याची मागणी सुधार समितीने केली आहे. या रस्त्यासाठी मिळालेल्या २९ कोटी रुपये निधीचा योग्य वापर होण्यासाठी रस्त्याचा दर्जा व रुंदीकरणाबाबत कुचराई खपवून घेतली जाणार नसल्याचे आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले.
मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिनी २७ मे रोजी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २९ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महापालिका विकास आराखड्यात हा रस्ता २४.४० मीटर आहे. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा २२ मीटर मार्किंग आहे. त्यामुळे मंजूर विकास आराखड्याप्रमाणेच रस्ता करण्याची मागणी समितीचे ॲड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, मुस्तफा बुजरूक, बाळासाहेब पाटील, असिफ निपाणीकर, शाहिद सतारमेकर, नयूम नदाफ यांनी आमदार सुरेश खाडे यांच्याकडे केली आहे. यावेळी स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, भाजपचे शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कुचराई खपवून घेणार नसल्याचे आमदार सुरेश खाडे यांनी यावेळी स्पष्ट केले.