मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार, शिवरायांच्या अपमानानंतरही गप्प: दिगंबर जाधव
By शीतल पाटील | Published: November 22, 2022 08:19 PM2022-11-22T20:19:59+5:302022-11-22T20:23:30+5:30
हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. भाजपचे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करीत असताना शिंदे गप्पच आहेत.
सांगली : हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. भाजपचे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करीत असताना शिंदे गप्पच आहेत. सत्तेसाठी ते लाचार झाल्याची टीका शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केली.
जाधव म्हणाले, शिंदे यांच्या हिंदुत्वाचा फुगा फुटला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बदनामीकारण वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांच्याबाबत शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली नाही. शिंदे सत्तेसाठी लाचार झाल्याने ते राज्यपाल व भाजपविरोधात मौन बाळगून आहेत.
आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना सावरकरांशी करून त्यांचा अपमान केला. सावरकर मोठे असतीलही पण त्यांची महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. हेच शेलार आता त्रिवेदींच्या विधानाला विरोध करत आहे. आठ दिवसात त्यांचे महाराजावरील प्रेम उफाळून आले. हा दुटप्पीपण आहे. कोश्यारी, फडणवीस, शेलार, त्रिवेदी यांना शिवाजी महाराजांबद्दल कधीच अभिमान नव्हता. भाजपचे नेते सांगलीत आल्यावर त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळे फासतील असा इशारा जाधव यांनी दिला.
महाराजाच्या वारसांनी मैदानात यावे
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या विरोधात जनता रस्त्यावर आली आहे. सावरकर, महात्मा गांधी यांचे वारसदार थेट मैदानात येतात. तसे छत्रपतींच्या वंशजांनीही रस्त्यावर यावे. लाखो लोक त्यांच्यासोबत रस्त्यावर येऊन मोर्चे काढतील, असे जाधव म्हणाले.