दौऱ्यात बदल करुन मुख्यमंत्र्यांनी घेतलं वसंतदादांच्या नातीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन, कुटुंबियांचे केलं सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 02:18 PM2022-08-13T14:18:47+5:302022-08-13T14:32:09+5:30
डॉ. मधू पाटील यांचे निधन झाले होते. त्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्यात बदल करीत वसंतदादांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
सांगली : दौऱ्यात बदल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधू पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील तसेच काँग्रेस नेत्या शैलजाभाभी पाटील यांचे त्यांनी सांत्वन केले.
काल, शुक्रवारी रात्री डॉ. मधू पाटील यांचे निधन झाले होते. त्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्यात बदल करीत वसंतदादांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ‘वसंत’ बंगल्यावर ठेवण्यात आलेल्या मधू पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत शिंदे यांनी प्रतीक व विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. ‘तुमच्या दु:खात मी सहभागी आहे’ अशा शब्दात त्यांनी त्यांचे सांत्वन केले.
यावेळी आ. विक्रम सावंत, महेंद्र लाड, माजी महापाैर सुरेश पाटील तसेच शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री विट्याकडे रवाना झाले. शिंदे गटातील आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे बाबर यांच्या सांत्वनासाठी त्यांनी दौरा केला.
महापौरांकडून स्वागत
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सांगलीत कॉलेज कॉर्नर चौकात मुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगरसेवक विष्णू माने, माजी नगरसेवक आयुब बारगीर, सुरेश बंडगर आदी उपस्थित होते. काही महिलांनी त्यांचे औक्षणही केले.