मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी इस्लामपूर दौऱ्यावर, जयंत पाटीलांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:27 PM2024-02-22T19:27:45+5:302024-02-22T19:28:07+5:30
हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींवर लक्ष केंद्रित
अशोक पाटील
इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेतील हवा काढून घेतली असली, तरी त्यांच्या मतदारसंघात विरोधक राजकीय हवा तयार करण्यासाठी सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचा शिवसेनेचा गट शक्तिप्रदर्शाची जोरदार तयारी करीत असल्याने जयंतसेना अस्वस्थ दिसत आहे.
जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात २५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दावा मजबूत करीत एकीकडे राजू शेट्टी यांना ‘टार्गेट’ केले जात आहे, तर दुसरीकडे जयंत पाटील यांचा मतदारसंघ काबीज करण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. या चर्चेने इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात भाजप नेते अस्वस्थ झाले होते. जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्येही या चर्चेने संभ्रम निर्माण केला होता. जयंत पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करीत दोन्हीकडील नेते व कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर केला.
दक्षिण महाराष्ट्रात भाजपकडे खमके नेतृत्व नसल्याने भाजप जयंत पाटील यांच्यावर दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे बोलले जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना ताकद देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने इस्लामपूर व शिराळा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.
इस्लामपूर मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी पक्षाचे अस्तित्व जिवंत ठेवले आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असतो; परंतु भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विधानसभेची तयारी केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही भाजपकडून चाचपणी केली गेली आणि उमेदवारीसाठी राहुल आवाडे यांना कानमंत्र देऊन शिवसेनेविरुद्ध डाव केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तसेच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठीची खेळी कितपत यशस्वी होणार, याची चर्चा राजकीय पटलावर रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इस्लामपूर दौरा शासकीय आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ते येत आहेत यामध्ये कोणतेही राजकारण नाही. - खासदार धैर्यशील माने, हातकणंगले
मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर मतदारसंघातील अनेक कामांसाठी निधी दिला असून यातील काही कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. -आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना, शिंदे गट