Lok Sabha Election 2019 घोटाळ्यातील पैशातूनच विखेंचे तोंड मुख्यमंत्र्यांनी बंद केले का? : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:13 AM2019-03-26T00:13:11+5:302019-03-26T00:15:35+5:30
दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच
सांगली : दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच पैशातून त्यांनी विखेंचे तोंड बंद केले आहे का, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
ते म्हणाले की, मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत फडणवीस सरकारने बिल्डरांना एक लाख कोटीचा फायदा करून देताना दहा हजार कोटीचा सौदा केल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. दहा हजार कोटींपैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री कार्यालयास मिळाल्याचेही विखे-पाटील यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांना हा आरोप जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांनी विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही काळातच त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे विखे-पाटील यांचे तोंड याच पाच हजार कोटी रुपयांमधून बंद केले का, अशी शंका उपस्थित होत आहे.
कोल्हापूर येथील सभेत फडणवीस यांनी माझ्यावर, चोरांच्या कळपात गेल्याचा आरोप केला होता. मी कोणाच्या कळपात गेलो आहे हे जनतेला माहीत आहे. मात्र मुख्यमंत्री असूनही ते दरोडेखोरांच्या कळपात गेलेत, हे केव्हाच लोकांनी ओळखले आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या सरकारवर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या टोळीबद्दल चिंतन करावे आणि त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देताना या सरकारचे बिंगही फोडू, असा इशाराही त्यांनी दिला.बांधकाम कामगार मंडळाशी संबंधित दहा हजार कोटी रुपयांचा एक घोटाळा समोर येत आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी त्याबाबतचा पंचनामा मी करणार आहे, असे ते म्हणाले.
...तर काँग्रेसविरोधातही शड्डू
भाजपबरोबर गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केल्यानंतर मी सरकारमधून बाहेर पडलो. काँग्रेस पक्षाबरोबर आता आघाडी केली असली तरी, भविष्यात त्यांनीही शेतकऱ्यांविरोधात एखादी गोष्ट केली, तर त्यांच्याविरोधातही आम्ही शड्डू ठोकू. आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बांधील आहोत, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
चौकीदाराला चोर म्हणणारे सध्या भाजपसोबत
चौकीदार चोर आहे, असे उघडपणे सांगत फिरणारे शिवसेनेचे नेते आता त्यांच्या चौकीदाराचे गोडवे गाताना दिसत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात आमची लढाई भाजप व शिवसेनेसोबत राहील. लोकशाहीसाठी धोकादायक असे हे सरकार आहे. त्यामुळे त्यांना वेळीच देशातून आणि राज्यातून हद्दपार करणे गरजेचे आहे, असेही शेट्टी म्हणाले.
‘स्वाभिमानी’चा उद्या प्रचार प्रारंभ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार प्रारंभ येत्या २७ मार्चरोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या जन्मभूमीत दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यानंतर आम्ही राज्यभर प्रचारसभा घेणार आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले.