पाणी साचलंय कुठे, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवावे!
By admin | Published: October 29, 2015 11:33 PM2015-10-29T23:33:48+5:302015-10-30T23:16:59+5:30
जयंत पाटील : २४ टीएमसी म्हणजे किती पाणी, हे त्यांना कळते का? राष्ट्रवादीचा आटपाडी तहसीलवर मोर्चा
आटपाडी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले, ते जलयुक्त शिवार योजनेमुळं पाणी कुठं-कुठं अडलंय हे पाहायला. त्यांचा दावा आहे की या खड्ड्यांमध्ये राज्यात २४ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला. ही नुसती धूळफेक आहे. २४ टीएमसी म्हणजे किती पाणी, हे त्यांना कळते का? मराठवाड्यात पाऊस झाला नाही, तिथे पाणी कसे साचेल? कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या तालुक्यात पाणी साचले आहे, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवावे, असे आव्हान माजी ग्रामीण विकासमंत्री तथा आ. जयंत पाटील यांनी येथे दिले.राष्ट्रवादीच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. बस स्थानकापासून मुख्य व्यापारी पेठेतून घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तिथे आंदोलकांसमोर बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले की, लोकांनी हौसेने निवडून दिलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने वर्षभरात सामान्यांचे संसार मोडायला सुरुवात केली आहे. प्रसारमाध्यमांना सांगण्यासाठी मुद्दे सरकारकडे नाहीत. ग्रामीण भागाला, दुष्काळी भागाला दिलासा देणारे हे सरकार नाही. आमच्या १५ वर्षांच्या कालावधित आम्ही टेंभू आणि म्हैसाळ योजनेला पैसे देताना कधी मोजदाद केली नाही. जोपर्यंत या योजना पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुबलक मोफत पाणी दिले. टंचाईतून वीजबिल भरत होतो. आता म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी, ज्या शेतकऱ्यांनी पाणी वापरलं नाही, त्यांच्याही सात-बारावर चढविण्याचे काम सुरू आहे.
आमची सत्ता गेली, याचं दु:ख नाही. जनतेला या शासनाकडून ज्या आशा-अपेक्षा होत्या, त्यांचा चुराडा झाला, याचं दु:ख आहे. राज्यातील तीन विचारवंतांच्या हत्या झाल्या. समीर गायकवाडला अटक करताच मास्टर मार्इंड रुद्रगौडाला अटक करण्यात राज्य आणि केंद्राच्या पोलिसांना अपयश आले. रुद्रगौडाला तात्काळ अटक झाली असती, तर सनातन अथवा खुन्यांच्या पाठीमागे असलेला राजकीय पक्ष उघड झाला असता. आता ते होणार नाही. केंद्र शासनाने तुरीची आधारभूत किंमत वाढविली असती, तर तुरडाळ महाग झाली नसती. परवा मुख्यमंत्री फडणवीस पडळकरवाडीला आले. तेव्हा प्रत्येक अर्थसंकल्पानंतर पश्चिम महाराष्ट्रात निधी नेला, म्हणून ते ओरडायचे. अनुशेषावर दोन शब्दही ते बोलत नाहीत. योजना रखडल्याचे पाप त्यांचेच आहे.
खेद व्यक्त करून आता दोन पावलं टाकतो, असे त्यांनी बोलायला पाहिजे. धनगर आरक्षणही त्यांनी दिले नाही, असे पाटील म्हणाले.
माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, देशातील एक नंबरचा हा दुष्काळी भाग आहे. पीक निघाल्यावर पाणीपट्टी मागितली जाते. पण याच भागावर प्रयोग सुरू आहेत. आधी पाणीपट्टी द्या म्हणत आहेत. आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील सर्व तलाव वर्षातून चारवेळा भरून दिले, तर दोन्हीही तालुक्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली येईल. परिसरातील सर्व साखर कारखान्यांची क्षमता वाढवावी लागेल. पण सध्या पाटबंधारे विभागाच टेंभू योजनेच्या कार्यक्षेत्राबद्दल संभ्रमात आहे. तलावातून बंद पाईपलाईनने पाणी नेऊन एकरी १८ ते २० हजार पाणीपट्टी द्यायला आम्ही तयार आहोत, पण पाणी द्यायला तयार नाहीत. या सरकारने सहा महिन्यांत पैसे निर्माण करून रिझल्ट द्यायला पाहिजे होते.
यावेळी हणमंतराव देशमुख, माजी सभापती सुमन नागणे, सावंता पुसावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, विद्या देशपांडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश देशमुख, बाबासाहेब मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हर्षवर्धन देशमुख, किसनराव जानकर, भगवानराव मोरे, सरपंच स्वाती सागर, भागवत माळी, दादासाहेब पाटील, बळी मोरे, भीमराव वाघमारे, नारायण चवरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. (वार्ताहर)
बाबर यांना विनाशकाले विपरित बुद्धी!
पडळकरवाडीला मुख्यमंत्री आले तेव्हा आ. बाबर तिथे गेले नाहीत. आ. बाबर यांना विनाशकाले विपरित बुद्धी सुचली. त्यांना आम्ही सन्मानाची वागणूक देत होतो. शिवसेनेचा कुठलाही आमदार बघितला, तर मुख्यमंत्र्यांचे मस्तक हलते. मातोश्रीवर गेले आणि आठ तास थांबल्यानंतर निरोप येतो, साहेब आज खाली येणार नाहीत. राजेंद्रअण्णांनी आता शरद पवारांना फोन करू द्या, त्यांनी नाही उचलला तर नाव बदलून ठेवा, असे आवाहन करून, काळ मोठा विपरित आला आहे, अशी खंत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांची फसवणूक : मुख्यमंत्र्यांकडून धूळफेक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यानंतर धुतल्या तांदळासारखे आणि सर्व ज्ञान असणारे जयंत पाटील हे नेते आहेत, असे कौतुक करून राजेंद्रअण्णा देशमुख यांनी, पाण्यावर पीक आले आणि हुरडा झाल्यावर शिवारफेरी असते. शिवारात काहीच नसताना मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली. कामापेक्षा अपमानावरच त्यांचे लक्ष अधिक होते. आपल्या आमदारांचा त्यांनी अपमान केला, असा आरोप केला.