मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात उभे राहावे : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:01 AM2019-09-10T02:01:54+5:302019-09-10T02:02:16+5:30
आष्टा (ता. वाळवा) येथे निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पाटील यांची घेतली
आष्टा (जि.सांगली) : इस्लामपूर (वाळवा) विधानसभा मतदारसंघात माझ्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उभे रहावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
आष्टा (ता. वाळवा) येथे निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पाटील यांची घेतली. प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर राज्यभर फिरून राष्ट्रवादीमध्ये नव्या तरुण कार्यकर्त्यांचा समावेश केलेला असून, प्रत्येक ठिकाणी शिवसेना-भाजपला पर्याय निर्माण केला आहे. अनेक लोक भीतीपोटी, पोलिसांचा ससेमीरा, ईडीची चौकशी टाळण्यासाठी पक्ष सोडत आहेत. माझ्या आयुष्यात १९९० मधील माजी आमदार विलासराव शिंदे यांच्याविरुद्धची विधानसभेची निवडणूक अटीतटीची झाली.
शरद पवार यांनी किल्लारी भूकंपावेळी केवळ तीन तासात सर्व यंत्रणा कामाला लावून त्याठिकाणी मुक्काम करून भूकंपग्रस्तांना न्याय दिला होता. त्याचप्रमाणे जर पूरग्रस्तांना शासनाने आधार दिला असता तर बरे झाले असते, असेही पाटील म्हणाले.
मलाही ऑफर होती!
भाजपकडून मला अनेकवेळा ऑफर देण्यात आली. सत्ताधारी गटाबरोबर विरोधी गटातही माझे चांगले मित्र आहेत, मात्र शरद पवार यांच्यावर माझा विश्वास आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.