मुख्यमंत्र्यांनी ३२ कोटी दिल्यावरच दौरा करावा
By admin | Published: October 15, 2015 11:24 PM2015-10-15T23:24:45+5:302015-10-16T00:51:03+5:30
सुनील पोतदार : ‘म्हैसाळ’च्या निधीचा प्रश्न
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जत तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामाची पाहणी करण्यासाठी जत दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रथम जत तालुक्यातील ४२ गावांसाठी ‘म्हैसाळ’चे पाणी आणण्यासाठी ३२ कोटींचा निधी द्यावा, त्यानंतरच दौऱ्यावर यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पाणी संघर्ष समितीचे सुनील पोतदार यांनी दिला आहे. जत तालुक्यातील कर्नाटक सीमाभागातील ४२ गावांमध्ये मूलभूत सुविधांसह म्हैसाळ योजनेचे पाणी दिले नाही. त्यामुळे या गावांचा विकास खुंटला आहे. येथील जनता पाण्यासाठी भटकंती करीत आहे. म्हणून या प्रश्नावर उमदीसह ४२ गावांनी सांगली येथे आंदोलन छेडले होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी, जत तालुक्यासाठी ३२ कोटींचा निधी तातडीने देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन महाजन यांनी पाळले नाही. यामुळे जत तालुक्यातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी करण्यापूर्वी ३२ कोटींचा निधी द्यावा, त्यानंतरच जत येथील दौऱ्यावर यावे, असा इशारा पोतदार यांनी दिला आहे. या प्रश्नावर कार्यकर्त्यांची बैठक झाली.
यावेळी अनिल शिंदे, दावल शेख, गजानन जाधव, चंद्रकांत नागणे, राजकुमार चव्हाण, मलय्या मठपती, बाळासाहेब शिंदे, महंमद कलाल, प्रकाश सुतार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)