मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या जिल्हा दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:19+5:302021-08-01T04:25:19+5:30
सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत. गेल्या आठवड्यातील ...
सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत. गेल्या आठवड्यातील त्यांचा दौरा तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर पडला होता. सोमवारी ते पूरग्रस्त भागाची पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत. मात्र, प्रशासनाकडून दौऱ्याबाबत दुजोरा मिळू शकला नाही.
गेल्या आठवड्यात महापुरामुळे जिल्ह्यातील शेती, घरे, बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राज्यातील प्रमुख मंत्र्यांचे दौरे झाले आहेत. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरेही जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मात्र, दौरा लांबणीवर पडला. आता सोमवारी ते येत आहेत. सकाळी त्यांचे पलूस येथे आगमन होणार असून, त्यानंतर ते भिलवडी, अंकलखोप परिसरातील पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. तेथून सांगलीत येऊन आयर्विन पूल व इतर ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, दौऱ्याबाबत अधिकृत दुजाेरा मिळू शकला नाही.