मुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर
By admin | Published: May 19, 2017 12:26 AM2017-05-19T00:26:37+5:302017-05-19T00:26:37+5:30
मुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली, मिरज दौरा निश्चित झाला असून, तो आता शुक्रवारी (दि. १९) सकाळऐवजी दुपारपासून सुरू होणार आहे. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकार्पण समारंभासह विविध शासकीय कामांची प्रत्यक्ष पाहणी आणि आढावा बैठक असे कार्यक्रम निश्चित केले आहेत.
दौऱ्यातील बदलानुसार १९ मेरोजी दुपारी एक वाजता वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. तिथून ते विजयनगरला जाणार आहेत. त्यानंतर १ वाजून १५ मिनिटांनी विजयनगर येथील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तेथून ते मोटारीने दुपारी दीड वाजता सुभाषनगरला जाणार असून, तेथील आगट तलावातील लोकसहभागातून गाळ काढलेल्या कामाची पाहणी ते करणार आहेत. दुपारी अडीच वाजता मल्लेवाडी (ता. मिरज) येथील जलयुक्त शिवारअंतर्गत बांधण्यात आलेल्या सुखकर्ता बंधाऱ्याची ते प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत. तेथून मुख्यमंत्री लगेचच नरवाडकडे रवाना होणार आहेत. नरवाड येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्यास ते भेट देणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता नरवाडमधून ते मिरजेकडे रवाना होतील. ३ वाजून ५० मिनिटांनी मिरजेच्या शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होणार आहे. सव्वाचार वाजता तेथे सांगली जिल्ह्याची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत आमदार, खासदार, शासकीय अधिकाऱ्यांसमवेत ते चर्चा करणार आहेत. ५ वाजून ४५ मिनिटांनी ते मिरजेतून इचलकरंजीकडे मोटारीने रवाना होणार आहेत.