मुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर
By Admin | Published: December 30, 2016 11:47 PM2016-12-30T23:47:58+5:302016-12-30T23:47:58+5:30
प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन,
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, शिराळा आणि ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन, प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, यशवंत दूध संघ, यशवंत ग्लुकोज कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सकाळी अकरा वाजता शिराळा येथे १४.६९ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन आहे. त्यानंतर यशवंत ग्लुकोज कारखान्याची गाळप क्षमता १५0 टनावरून २५0 टन प्रतिदिन वाढविण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. शिवाजी केन या प्रकल्पास भेट, औद्योगिक वसाहतीतील यशवंत मल्टीस्टेट या दूध संघाच्या दोन लाख लिटर प्रतिदिन प्रक्रिया करणाऱ्या १0 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे उद्घाटन आहे. ८.५0 कोटी रूपये खर्चाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही आहे. त्यानंतर पोलिस ग्राउंडवर दुपारी १२ वा. शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे, नानासाहेब महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आ. भगवानराव साळुंखे,
जि. प. सदस्य रणधीर नाईक, मकरंद देशपांडे, नीता केळकर उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)
ढालगावात भूमिपूजन
ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे टेंभू योजनेच्या वितरिकेच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दुपारी २.४५ वाजता होणार आहे. याचवेळी म्हैसाळ योजनेतील आगळगाव, जाखापूर योजना आणि जत तालुक्यातील अंकले व टप्पा क्रमांक सहा ब खलाटी योजनेचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.