मुख्यमंत्र्यांचे जातीवाचक विधान चूक
By admin | Published: October 25, 2016 11:25 PM2016-10-25T23:25:11+5:302016-10-26T00:17:20+5:30
जयंत पाटील : सोशल इंजिनिअरिंग करताना फडणवीस यांचा गोंधळ
सांगली : केवळ ब्राह्मण असल्याने मला मुख्यमंत्री-पदावरून कोणी काढणार नाही, असे जातीवाचक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांना कधीही कोणी जातीवाचक बोलले नाही. तरीही ते असे का बोलत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध जाती, धर्मांचे मोर्चे निघत असल्याने सोशल इंजिनिअरिंग कसे करायचे, याबाबत त्यांचा गोंधळ झालेला दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, मंत्रिमंडळातील सहकारी, घटक पक्षांचे नेते तसेच विरोधक म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मुख्यमंत्री कुंडल्या काढण्याचा दम देत आहेत. शत्रू कोण आहे, हेच देवेंद्र फडणवीस यांना कळेना झाले आहे. त्यांचे सहकारी मंत्रीही या गोष्टींना सामोरे गेले आहेत. आम्ही तर विरोधी पक्षातील असल्याने आम्हाला असा इशारा देणे स्वाभाविक आहे. सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली असताना, अशाप्रकारची दमाची भाषा योग्य नाही. कुंडल्या काढण्याचा इशारा देत कारभार करण्यापेक्षा गोडीगुलाबीने राज्य त्यांनी चालवावे. लोकांच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. महागाईचा सामना जनता करीत असताना, त्याकडे सरकारचे लक्ष नाही. अंदाजपत्रकामध्ये यांचे सरकार डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते आणि तरीही ऐन सणासुदीला डाळीचे दर गगनाला भिडलेले आहेत. दिवाळी झाल्यानंतर डाळीचे दर उतरतील आणि हेच सरकार दर कमी केल्याचा डांगोरा पिटणार आहे. सामान्य लोकांसाठी कोणतेही नियोजन सरकार करीत नाही, ही गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडत असतानाच पोलिसांवरही हल्ले होत आहेत. सक्षमपणाने गुन्हेगारी मोडीत काढण्याची यंत्रणाच सरकारकडे नाही. गृहमंत्रीपद सोडण्यास फडणवीस तयार नाहीत. स्वतंत्रपणे गृह खाते सांभाळणारा एखादा विश्वासातला सहकारीच त्यांच्याकडे नसावा, असे वाटते. (प्रतिनिधी)
साखरेला जादा दर मिळावा
एफआरपीपेक्षा जादा दर उत्पादकांना मिळायला हवा, अशी मागणी होत आहे. साखरेला जादा दर मिळाला की ही गोष्टही साध्य होऊ शकते. केंद्र शासनाचे धोरण पाहता, साखरेचे दर वाढूच नयेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. ही नीती ऊस उत्पादकांच्या मुळावर घाव घालणारी आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
निवडणूक संस्थेची, कारखान्याची नव्हे
‘सर्वोदय’च्या निवडणुकीबाबत जयंत पाटील म्हणाले की, ही कारखान्याची निवडणूक नसून, सर्वोदय कारखाना या संस्थेची निवडणूक आहे.
शिवसेना लाचार का : सत्ता निरर्थक...
सरकारमध्ये सध्या गोंधळाची स्थिती आहे. शिवसेना आणि भाजपने एकमेकांना भ्रष्टाचारी म्हणून जाहीर प्रमाणपत्रच दिले आहे. स्वाभिमान जपायचाच असेल तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे. सत्तेत राहण्यात अर्थच उरला नसताना, शिवसेना घटक पक्ष म्हणून सत्तेत आहे. एवढी लाचारी शिवसेना नेते का करीत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांचा कसला नाईलाज आहे, हेसुद्धा कळत नाही.
आम्ही समाज एकत्र बांधला
पन्नास वर्षे कॉँग्रेस आणि आघाडी सरकारने मराठा समाजाला काय दिले, असा सवाल काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, आम्ही जे दिले, ते सांगण्यासाठी वेळही पुरणार नाही. तरीही गेल्या अनेक वर्षांत आम्ही सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्यात यश मिळविले.