रखडलेल्या कामांना मुख्यमंत्री दौऱ्याचा मुहूर्त
By admin | Published: December 25, 2015 11:14 PM2015-12-25T23:14:20+5:302015-12-26T00:05:53+5:30
संजयकाकांकडून पाहणी : तासगावातील विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
दत्ता पाटील --तासगाव शहरात नगरपालिकेच्यावतीने व्यापारी संकुलाचे, तसेच जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणी योजनेचे काम सुरु आहे. या दोन्ही योजना तासगावकरांसाठी महत्त्वाकांक्षी आहेत. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या हालगर्जीपणामुळे दोन्ही योजनांचे काम मुदतवाढ देऊनदेखील वेळेत पूर्ण झाले नाही. नुकतीच खासदार संजयकाका पाटील यांनीदेखील या कामांची पाहणी करुन तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
तासगावात मुख्यमंत्री दौऱ्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे या कामांना मुख्यमंत्री दौऱ्याचा तरी मुहूर्त लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तासगाव शहरात मध्यवर्ती बसस्थानकालगत व्यापारी संकुल आणि भाजीपाला मार्केटच्या कामाला चार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती. ३ कोटी ७० लाख रुपयांचे हे काम आहे. मात्र कामाची मुदत संपल्यानंतरदेखील ठेकेदाराकडून काम पूर्ण झाले नाही. नगरपालिकेच्यावतीने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ संपली तरीदेखील ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे हे काम रखडले होते. याबाबत नागरिकांतूनही नाराजी व्यक्त होत होती. अखेर खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत: लक्ष घातले. कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे व्यापारी संकुलाचे उर्वरित काम तातडीने सुरु झाले आहे.
तासगाव शहरातील विस्तारित भागासह नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय व्हावी, यासाठी तासगाव शहरासाठी तिसऱ्या टप्प्यातील पाणी योजनेलादेखील चार वर्षापूवी मंजुरी मिळाली होती. ही योजना २२ कोटी ५० लाख रुपयांची आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत याचे काम सुरु आहे. या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांतून तक्रारी आहेतच. मात्र हे कामही ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे मुदतीत पूर्ण झाले नाही. याही कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.
तासगाव शहरातील नागरिकांना ही योजना मार्गी लागल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. खासदार संजयकाकांनी काम गतीने व्हावे, यासाठी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर हे काम गतीने सुरु झाले आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तासगावात मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याचे नियोजन भाजपच्यावतीने सुरु आहे. या दौऱ्यात शहरातील विकास कामांचे उद्घाटन करण्याचे नियोजन पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे.
रखडलेल्या दोन्ही कामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांकडून घेण्याबाबत हालचाली सुरु आहेत. त्यामुळे किमान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने का होईना, पण रखडलेली विकासकामे मार्गी लागावीत, अशी तासगावकरांची अपेक्षा आहे.
नगरपालिकेच्या नव्या इमारत कामाचाही मुहूर्त
तासगाव नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन हा निधी मंजूर करुन दिला आहे. या निधीतून कोकणे कॉर्नरजवळ नवीन प्रशासकीय इमारत होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित झाल्यास, या दौऱ्यात पालिकेच्या नवीन इमारत बांधकामाचा मुहूर्त होण्याची शक्यता आहे.