मुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:54 AM2019-12-27T11:54:06+5:302019-12-27T11:55:39+5:30

तासगाव नगरपालिकेची दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व सभा झाली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रशासन आणि कारभारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. कारभाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करून भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनीदेखील, भानगडी बाहेर काढण्याचा इशारा दिला.

Chief, sir, get out the frizz! | मुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच!

मुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच!

Next
ठळक मुद्देमुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच!भानगडबाज कारभारावर शिक्कामोर्तब

दत्ता पाटील 

तासगाव : तासगाव नगरपालिकेची दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व सभा झाली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रशासन आणि कारभारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. कारभाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करून भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनीदेखील, भानगडी बाहेर काढण्याचा इशारा दिला.

एकमेकांच्या भानगडीमुळे पालिकेतील भानगडबाज कारभारावर शिक्कामोर्तब झाले. आता मुख्याधिकाऱ्यांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता भानगडी चव्हाट्यावर आणाव्यात, अशी मागणी तासगावकरांकडून होत आहे.

तासगाव नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी आणून विकासाची गंगा वाहती ठेवण्याचा प्रयत्न केला. नेमके याच वाहत्या गंगेत सत्ताधाऱ्यांनी हात धुऊन घेण्याचे अनेक कारनामे केले. काही कारभाऱ्यांनी स्वत:च ठेकेदारी सुरु केली. काहींनी ठेकेदारांना पोसण्याचे उद्योग केले. जादा दराच्या निविदा, बेकायदा आणि बोगस कामे, निकृष्ट दर्जाची कामे, अशा एक ना अनेक कामांचा पायंडाच सत्ताधाऱ्यांनी सुरु केला होता.

बेकायदा कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, केवळ सत्ताधारी कारभारीच याला जबाबदार होते, अशी परिस्थिती नव्हती. अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्ट कारभार बोकाळला होता. विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अकांडतांडव करूनदेखील भ्रष्ट कारभाराचे सर्व कारनामे दडपून ठेवण्यात आले होते.

सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांचा हम करे सो कायदा, याप्रमाणेच कारभार सुरु होता. किंंबहुना अनेक बेकायदा कामे नियमात बसवून करण्याची नामी शक्कल लढवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षात भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही ना सत्ताधाऱ्यांनी खदखद केली, ना प्रशासनाने आक्षेप केला. मिळून सारे जण... असाच सर्व रागरंग होता.

मात्र काही महिन्यांपासून पालिकेच्या कारभारात बदल होत होता. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची फ्री हॅन्ड कामाची पध्दत सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणारी होती. मात्र नव्याने आलेले मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या कारकीर्दीत नियमांची सांगड घालून काम करण्यास सुरुवात झाली. इथूनच पालिकेच्या कारभाराला कलाटणी मिळाली.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरु असलेल्या बेलगाम कारभाराला मुख्याधिकारी शिंंदे यांनी लगाम लावला. त्यामुळे कारभाऱ्यांच्या मनमानीला चाप बसला. मुख्याधिकारी जुमानत नाहीत म्हटल्यावर आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनीच भ्रष्टाचाराविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. प्रशासनातील अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप केला. या आरोपांच्या फैरींनी संतप्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांना तुमच्या भानगडी बाहेर काढू असा सज्जड इशाराच भर सभेत देऊन टाकला.

मुख्याधिकाऱ्यांच्या वक्तव्याने पालिकेत भानगडी आहेत, यावर शिक्कामोर्तब झालेच. मुळातच पालिकेचा कारभार भानगडबाज असल्याचे अनेकदा चव्हाट्यावर आले होते. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाचे अंडरस्टॅँडिंग असल्याने या कारभाराची चिरफाड झाली नाही.

मात्र मुख्याधिकारी शिंंदे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच, पालिकेतील स्वच्छतेच्या ठेक्याची बोगस कागदपत्रे बाहेर पडली. त्यापूर्वी अशा बेकायदा कामाचा एकही कागद जनतेसमारे आला नाही. मात्र आता मुख्याधिकारी शिंंदे यांनी चॅलेंज केलेच आहे, तर भानगडी चव्हाट्यावर काढाव्यात, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे कारभारी असोत अथवा प्रशासनातील अधिकारी असोत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. जनतेच्या हितासाठी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या भानगडी बाहेर काढाव्यात, नाही तर अधिकाऱ्यांनी कारभाऱ्यांच्या भानगडी बाहेर काढाव्यात. नेमक्या भानगडी जनतेसमोर आल्याशिवाय भानगडबाज पालिकेतील नेमक्या भानगडी कोणी केल्या, हे चव्हाट्यावर येणार नाही.
 

Web Title: Chief, sir, get out the frizz!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.