सांगलीत साखर कारखान्यात बालकामगार; ठेकेदारावर गुन्हा दाखल
By शरद जाधव | Published: December 7, 2023 08:22 PM2023-12-07T20:22:20+5:302023-12-07T20:23:13+5:30
मध्यप्रदेशमधील तेरावर्षीय मुलगा काम करताना आढळला. याप्रकरणी तातडीने गुन्हा नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील दत्त इंडिया साखर कारखान्यात परप्रांतीय बाल कामगाराला कामावर ठेवून काम करून घेत असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी दुकाने निरीक्षक रोहित विश्वनाथ गोरे (रा. सांगली) यांनी संशयित ठेकेदार हणमंत आत्माराम कायगुडे (रा. वसंतदादा कॉलनी, सांगली) याच्या विरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दत्त इंडिया कारखान्यात बालकांकडून काम करवून घेतली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर याची खातरजमा करून पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. दुकाने निरीक्षक फिर्यादी गोरे यांनी त्यांच्या पथकासह गुरूवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास कारखान्यात छापा टाकून पाहणी केली.
यात मध्यप्रदेशमधील तेरावर्षीय मुलगा काम करताना आढळला. याप्रकरणी तातडीने गुन्हा नोंद करण्याचे निर्देश बालकल्याण समितीचे सदस्य दीपाली खैरमोडे, आयेशा दानवडे, कालिदास पाटील, निवेदिता ढाकणे यांच्या पीठाने दिले होते. त्यानुसार दुय्यम निरीक्षक रोहित गोरे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात बाल कामगार ठेऊन त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या संशयित हणमंत कायगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.