बालकांचे हक्क आणि सुरक्षितता जाणीव जागृतीसाठी बाल सुरक्षा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:18 AM2019-11-14T11:18:45+5:302019-11-14T11:23:55+5:30
संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता स्वीकारली व त्याच्यावर 190 देशांनी स्वाक्षरी करून आपल्या देशांमध्ये बाल हक्क मंजूर केले आहेत. यावर्षी यास 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यात बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर हा सप्ताह बाल सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग आणि युनिसेफ यांच्याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सांगली : संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता स्वीकारली व त्याच्यावर 190 देशांनी स्वाक्षरी करून आपल्या देशांमध्ये बाल हक्क मंजूर केले आहेत. यावर्षी यास 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यात बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर हा सप्ताह बाल सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग आणि युनिसेफ यांच्याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
बाल सुरक्षा सप्ताह अंतर्गत दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर या सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बाल दिनानिमित्त दप्तरविना शाळा, बाल सभेचे आयोजन, मुलांच्या हक्क आणि संरक्षण याबाबत मार्गदर्शन, आनंददायी खेळ व छंद स्पर्धा आयोजन, शाळा परिसरामध्ये मुलांना धोक्याच्या ठरतील अशा गोष्टीचा शोध घेणे व त्या दूर करणे, शाळा व्यवस्थापन समितीची सभा, मुलांच्या हक्क आणि संरक्षण याबाबत चर्चा, मुलांसाठी रंगोत्सव साजरा करणे, घोषवाक्य तयार करणे, पोस्टर बनवणे, चित्र काढणे अशा विविध स्पर्धा घेणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुलांच्या घरी भेट देवून त्यांच्या कुटूंबियांना शिक्षणाचे महत्व समजावणे, पालकांकडून मुलांचे हक्कांच्या संरक्षणासाठी मुलांना शिक्षण, आरोग्य, पोषक आहार, यासाठीची व्यवस्था प्रणाली समजावून सांगणे आणि बालविवाह, बालमजूर, विविध प्रकारचे होणारे शोषण इत्यादी अनिष्ठा प्रथा निर्मुलनासाठी पालकांमध्ये जाणीवजागृती करणे, विविध कला गुणांबाबत अभिव्यक्त होण्यासाठी कविता करणे, भाषण, एकांकिका, एकपात्री स्वागत, गायन, नकला, कथा-कथन, नाट्य सादरीकरण, आवडते पुस्तक वाचून स्वत:च्या भाषेत पुस्तकाचा सारांश गोष्ट स्वरूपात व्यक्त करणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करून मुलांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आनंद मेळावा, मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन भरवणे, पालक आणि मुलांचे संयुक्तिक खेळ, पालकांना मुलांच्या हक्क आणि संरक्षण याबाबत जागृत करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.