बालचमू रमले कथा, कविता, नाट्यछटांमध्ये!
By admin | Published: January 3, 2017 10:03 PM2017-01-03T22:03:46+5:302017-01-03T22:03:46+5:30
गप्पा, गाणी, कथा, कविता आणि नाट्यछटांमध्ये मंगळवारी महापालिकेच्या शाळांमधील बालचमू रमले. निमित्त होते बालकुमार साहित्य संमेलनाचे
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 3 - गप्पा, गाणी, कथा, कविता आणि नाट्यछटांमध्ये मंगळवारी महापालिकेच्या शाळांमधील बालचमू रमले. निमित्त होते बालकुमार साहित्य संमेलनाचे! सांगलीतील आमराई उद्यान संमेलनामुळे जणू काही बालमयच झाले होते. ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांनी नकला सादर करीत बालरसिकांची मने जिंकली. सकाळी ग्रंथदिंडीतील अस्सल पारंपरिकताही मुलांनी अगदी मनापासून जपली.
महापालिका व प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आमराईत बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महापालिकेपासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. सजविलेल्या पालखीत ज्ञानेश्वरी ठेवली. आयुक्त रवींद्र खेबूडकर, महापौर हारुण शिकलगार, स्थायी समितीचे सभापती संगीता हारगे, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, गोविंद गोडबोले यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी शाळा क्र. २० ची विद्यार्थिनी आदर्शा मोगणे होती. ग्रंथदिंडीत ५० शाळा सहभागी झाल्या होत्या. धनगरी ढोलनृत्य, लेझिम, झांजपथक होते. मुली-मुले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती. ग्रंथदिंडी आमराईमधील मुक्तांगण साहित्यनगरीत आल्यानंतर उद्घाटन झाले. यावेळी आयुक्त खेबूडकर म्हणाले की, महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत यापुढेही सतत असे अभिनव उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सतत हसत, खेळत राहावे, यादृष्टीने साहित्य संमेलनाची कल्पना आली. या मुलांनाही बालसाहित्यिकांना भेटता यावे, बालकथा, कविता, नाट्यछटा यांची माहिती व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.
बालसाहित्यिक गोडबोले यांनी लहानपणीच्या आठवणी, विनोदी किस्से सांगितले. यावेळी लहान मुलाचा रडण्याचा आवाज, रेल्वेचा आवाज, असे आवाज त्यांनी काढून दाखविले. पपेट शो सादर करण्यात आला. उपायुक्त स्मृती पाटील यांनीही मार्गदर्शनकेले. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांनी स्वागत केले. राकेश कांबळे यांनी आभार मानले. वेदिका देवके, मिसबाह मगदूम, फातिमा सज्जाद, वैष्णवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ज्ञानरचनावादाप्रमाणे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचेही आयोजन केले होते. ह्यअंकुरह्ण या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची मुलाखत, तसेच वसंत हंकारे यांचे व्याख्यान झाले.
ग्रंथदिंडीत शाळेतील मुलांनी सर्व राष्ट्रपुरुषांची वेशभूषा केली होती. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम , झाशीची राणी लक्ष्मीबाई, बालशिवाजी, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत मुले सहभागी झाली होती. सातवीमधील दिव्यांग विद्यार्थी तुषार मगदूम यानेही कविता, कथा सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली.