मुलांमध्ये औरंगाबाद, तर मुलींत कोल्हापूरला विजेतेपद
By Admin | Published: October 25, 2016 11:50 PM2016-10-25T23:50:57+5:302016-10-26T00:07:52+5:30
राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा : मुंबई व पुणे विभाग दुसऱ्या स्थानावर; राष्ट्रीय स्पर्धा मध्य प्रदेशला
सांगली : अत्यंत चुरशीने झालेल्या चौदा वर्षे गटाच्या शालेय राज्य कबड्डी स्पर्धेवर मुलांमध्ये औरंगाबाद, तर मुलींत कोल्हापूर विभागाने ठसा उमटवला. मुंबई व पुणे विभागास दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
मुलांमध्ये औरंगाबाद विरूध्द पुणे असा अंतिम सामना झाला. तगड्या औरंगाबादने अनुभवी पुण्याला जेरीस आणत ३६-१७ असा पुण्याचा पराभव केला. मुलींच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या रणरागिणींनी मुंबईला ४६-१७ अशा फरकाने नमवत विजेतेपद आपल्या नावे केले. राष्ट्रीय स्पर्धा हारडा (मध्य प्रदेश) येथे होणार आहेत. क्रीडाधिकारी कार्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा पार पडल्या.
पारितोषिक वितरण महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले होते. शंकर भास्करे यांनी स्वागत केले. आमसिध्द सोलणकर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन शिंदे, शिवाजी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष बाबा पाटील, उद्योजक किसन गावडे, विजय यादव, नेताजी पाटील, सुनील पुजारी आदी उपस्थित होते. पंच म्हणून विनायक विभुते, जितेंद्र पाटील, मुन्ना आलासे, भालचंद्र जाधव, आलम मुजावर, जयराज पाटील, सुरेश चिखले, झाकीर इनामदार, सुशील गायकवाड, पंकज जाधव, विलास गायकवाड, सुशांत गडदे, रणजित इनामदार, एस. आर. कुंभार यांनी काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)
सांगलीची पोरं अव्वल...
कोल्हापूर विभागाने मुलींमध्ये प्रथम, तर मुलांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कोल्हापूर विभागाच्या मुले व मुली या दोन्ही यशस्वी संघांवर सांगली जिल्ह्याने आपली मोहोर उमटवली आहे. मुलींच्या संघात बावची (ता. वाळवा) येथील शिवाजी हायस्कूलच्या, तर मुलांच्या संघात कोकरूड (ता. शिराळा) येथील यशवंत विद्यालयाच्या खेळाडूंचा भरणा होता.
स्पर्धेचा अंतिम निकाल असा :
मुले : औरंगाबाद (प्रथम), पुणे (द्वितीय), कोल्हापूर (तृतीय)
मुली : कोल्हापूर (प्रथम), मुंबई (द्वितीय), लातूर (तृतीय)