गुड न्यूज: येळावीच्या फोंड्या माळावर पिकला ज्ञानाचा मळा, घडले १८ डॉक्टर ६ इंजिनिअर
By हणमंत पाटील | Published: January 1, 2024 04:19 PM2024-01-01T16:19:04+5:302024-01-01T16:21:43+5:30
येथील एका दानशूर व्यक्तींनी आपली स्वतःची पाच गुंठे जागा शैक्षणिक कामासाठी दान केली
उत्तम जानकर
येळावी : एकेकाळी जेमतेम पंधरा ते वीस घरे असणारा वस्ती हा भाग. पडीवरली वस्ती हे तिचे नाव. पूर्वी या फोंड्या माळावर केवळ कुसळे उगवयाची. पण येथे येथील पाषाणाला पाझर फोडणारी माणसे जन्माला आली. ज्यानी माळाला कुसळे ही येणार नाहीत तिथे हाडाची काड करून मळा पिकवलाच. त्यासोबत ज्ञानाचाही मळा फुलविला. त्यामुळे येथे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १८ डॉक्टर, सहा इंजिनिअर, पाच सैनिक व घरटी एखादा शिक्षक आणि बरेच व्यावसायिक तयार झाले.
ही सत्य कहाणी आहे तासगाव तालुक्यातील येळावी गावातील पडीवरली वस्तीची. एकेकाळी जनावराला चरायला चाराही येथे मिळायचा नाही. उत्पन्नाच साधन म्हणजे रोजगार, मजुरी, कष्ट आणि कष्ट. कारण या माळावरील वस्तीला निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून होती. शेतीला हक्काचं पाणी नसल्याने भुईमूग, तुरी, सूर्यफुल अशी जेमतेम उत्पादन देणारी पीक होत. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागले ते करून पाषाणाला पाजर फोडणारी माणसे याच माळाला जन्माला आली आणि हिरवागार शिवार केला. त्याचबरोबर ज्ञानाचा मळा फुलल्याने या वस्तीवर शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा सूर्य उगवला.
या वस्तीवरील त्या काळातील तरुणांनी काहींनी भाजीपाला व्यापार चालू केला, तर काहींनी पुण्या मुंबईची वाट धरली. काहींनी कसे बस खडतर प्रवास करत शिक्षण पूर्ण केलं व नोकरीच्या रूपाने प्रपंचाला हातभार लावला. येथील एका दानशूर व्यक्तींनी आपली स्वतःची पाच गुंठे जागा शैक्षणिक कामासाठी दान केली. या जागेवर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण सुरू झाले. येथील अनेक विद्यार्थी तालुका, जिल्हा ,राज्यस्तरावर चमकले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, क्रीडा या विभागामध्ये आपल्या गुणाचा ठसा उमटवला. याच वस्ती वरील अनेक व्यक्ती सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवून आहेत. या फोंड्या माळावर फुललेल्या शिक्षणाच्या मळ्यात सतरा डॉक्टर, सहा इंजिनिअर, पाच सैनिक , शिक्षक आणि आणि व्यावसायिक निर्माण झाले.