Sangli News: पांडोझरीत लेकरांनी केला हट्ट, पालक झाले व्यसनमुक्त
By श्रीनिवास नागे | Published: December 29, 2022 05:40 PM2022-12-29T17:40:06+5:302022-12-29T17:41:38+5:30
मुलांनी वस्तीवरील ४० कुटुंबांना व्यसनमुक्त केले.
दरीबडची (जि. सांगली) : नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीची सवय बदलवणे अवघड असते; पण जत तालुक्यातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील मुलांनी फक्त पाच वर्षांत वस्तीवरील ४० कुटुंबांना व्यसनमुक्त केले. या पालकांनी मुलांच्या सांगण्यावरून व्यसनांना कायमची सोडचिठ्ठी दिली आहे.
पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्तीवरील द्विशिक्षकी शाळा आयएसओ मानांकन आहे. व्यसनात आहारी गेलेल्या पालकांना बाहेर काढणे, हे वस्तीवरील मोठे आव्हान होते. मुलांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती मोहीम राबवण्याचा संकल्प शिक्षकांनी केला. या उपक्रमात मुलांनी परिसरातील लोकांच्या चांगल्या-वाईट सवयी जाणून घेतल्या. दारू, सिगारेट, मावा, गुटखा, तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी कशाप्रकारे हानिकारक आहे, याबाबत माहिती घेतली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन व्यसनमुक्तीचे फायदे-तोटे समजावून सांगितले जाऊ लागले.
मुलांना वाटत होते की, आपल्या पालकांनी नशेच्या आहारी जाऊ नये. त्यामुळे वस्तीवरील लोकांना तोंडाच्या कर्करोगाचे फोटो दाखवत मुले फिरायची. हळूहळूू पालकांत जनजागृती झाली. मुले सांगतात म्हटल्यावर पालकांमध्ये चांगले बदल झाले. त्यांच्या मायेने पालकांना व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त केले. मुलांनी मार खाऊन, रुसवा धरून पालकांना व्यसनमुक्त होण्यास भाग पाडले. ४० कुटुंबे पूर्ण व्यसनमुक्त झाली आहेत. पाच वर्षांच्या तपश्यर्चेला चांगले फळे येत आहे.
दोन वर्षांपूर्वी दुसरीत शिकणारा मुलगा तेजस मला म्हणाला, तो जेवण करणार नाही. जेवणासाठी खूप समजावले. त्याच्या हट्टामागचे कारण विचारले. त्याने सांगितले की, तुम्ही व्यसन करणे बंद करा. त्यामुळे मी बंद केले. - मारुती गडदे, पालक
बाबा मला पैसे देऊन गुटखा आणायला सांगायचे. एक दिवस मी त्यांना म्हटले, हे गुटखा खाणे चांगले आहे, तर मी पण खाणार. मलाही द्या. तेव्हापासून त्यांनी गुटखा खाणे बंद केले. - धनश्री कुलाळ, विद्यार्थी
दोन वर्षांत व्यसनमुक्तीमुळे अनेक कुटुंबांत झालेले बदल आशादायी आहेत. आई-वडिलांमध्ये बदल घडविणारी ही मुले पुढे व्यक्तिगत आयुष्यातही चांगले बदल घडवतील, अशी मला खात्री वाटते. - दिलीप वाघमारे, शिक्षक