बालसवंगड्यांचा अभ्यास दौरा आणि स्वच्छता
By Admin | Published: December 12, 2014 10:54 PM2014-12-12T22:54:49+5:302014-12-12T23:32:44+5:30
कारखान्याला भेट : आरगच्या चार वस्तीशाळांचा संयुक्तिक उपक्रम
लिंगनूर : आरग परिसरातील चार वस्तीशाळांच्या मुलांनी परिसर भेटीअंतर्गत आरग येथील रेल्वे स्टेशन व मोहनराव शिंदे साखर कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन अभ्यास दौरा केला. कारखान्यातील ऊस उतरून घेण्यापासून ते प्रक्रिया करून साखरनिर्मिती व नंतर गोदामापर्यंत साखर साठवणुकीच्या टप्प्यापर्यंत विद्यार्थ्यांना उसापासून साखर कशी तयार होते, या विषयावर प्रात्यक्षिकासह अभ्यासदौरा पूर्ण केला. आरग येथील रेल्वे स्टेशनची स्वच्छताही स्वच्छ अभियान मोहिमेंतर्गत केली.
याच दौऱ्यात कार्यानुभव विषयांतर्गत स्वच्छता उपक्रम म्हणून व स्वच्छ भारत मोहिमेचा एक भाग म्हणून आरगच्या रेल्वे स्थानक व स्थानक परिसराची स्वच्छता करीत प्रवासी प्रतीक्षा कक्ष स्वच्छ केला.
लहानांच्या या स्वच्छ भारतच्या उपक्रमात आरग रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर शर्माही सहभागी झाले होते. किमान वर्षातून दोन परिसर भेटी घेतल्या जाव्यात, या नियोजनानुसार यावर्षी आरग परिरातील गायकवाड चव्हाण मळा, रामनगर अ, रामनगर ब, आरग स्टेशन या चार जिल्हा परिषदांच्या वस्ती शाळांनी या परिसर भेटीचे नियोजन केले होते.
त्यानुसार या चार शाळांतील ८० विद्यार्थी या भेटीत व अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. याच भेटीत कारखाना परिसरात ऊसतोड करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांमध्येही गृहभेटी घेऊन त्या मजुरांची जीवनशैली व दैनंदिन काम यांचीही माहिती शिक्षकांनी मुलांना यावेळी करून दिली.
या अभ्यास दौऱ्याचे व परिसर भेटीचे संयोजन या शाळांचे शिक्षक अमोल शिंदे, पांडुरंग नाईक, आकाश जाधव, अमोल भोई, विजय कदम, पोपट निकम, दिलीप पाटील यांनी केले. (वार्ताहर)