आईच्या खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 03:01 PM2019-06-20T15:01:45+5:302019-06-20T15:03:13+5:30
आईने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून, तिचा डोक्यात कोयत्याने वार करुन खून केल्याप्रकरणी वसंत चंदर वाघमारे (वय ४०, रा. काळेखडी, ता. आटपाडी, मूळ होनाड, ता. खालापूर) या मुलाला जिल्हा न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सांगली : आईने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून, तिचा डोक्यात कोयत्याने वार करुन खून केल्याप्रकरणी वसंत चंदर वाघमारे (वय ४०, रा. काळेखडी, ता. आटपाडी, मूळ होनाड, ता. खालापूर) या मुलाला जिल्हा न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ही घटना ४ मार्च २०१८ रोजी सकाळी साडेदहा वाजता काळेखडी येथे घडली होती. याप्रकरणी राजेंद्र रामराव चव्हाण (रा. घाटदेवळगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली होती.
चव्हाण हे सुमारे ७ वर्षांपासून कौठुळी (ता. आटपाडी) येथे भाड्याने खोली घेऊन राहत आहेत. त्यांचा ओढ्याच्या काठावरील चिल्लारीची झाडे तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याचा व्यवसाय होता. या कामावर आरोपी वसंत वाघमारे हा मजूर म्हणून काम करीत होता. वसंत याला दारूचे व्यसन होते.
घटनेदिवशी फिर्यादी चव्हाण हे त्यांच्या सासऱ्यासोबत कोळसा तयार करण्याच्या कामावर पाहणीसाठी जाणार होते. तत्पूर्वी ते आरोपी वसंतच्या झोपडीवर गेले. तिथे वसंत हा दारूच्या नशेत झोपला होता, तर त्याच्या बाजूला त्याची आई राणी चंद वाघमारे (७०) ही जखमी अवस्थेत पडलेली होती. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. चव्हाण यांनी वसंत याच्याकडे चौकशी केली असता, दारू पित असल्याने आईने शिवीगाळ केल्याने तिच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने दगडावर डोके आपटून घेऊन स्वत:लाही जखमी करून घेतले होते.
यानंतर फिर्यादी चव्हाण यांनी इतर कामगारांना बोलावून वसंत याला आटपाडी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच या घटनेची माहिती आटपाडी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला होता.