भारतीयांकडून चायनीज फटाके हद्दपार, देशी कंपन्यांनी दराच्या स्पर्धेतही मारली बाजी
By अविनाश कोळी | Published: November 9, 2023 02:11 PM2023-11-09T14:11:19+5:302023-11-09T14:11:40+5:30
अविनाश कोळी सांगली : भारतीय बाजारात २०१६ पर्यंत दबदबा निर्माण करणारे चायनीज फटाके आता हद्दपार झाले आहेत. महाराष्ट्रासह फटाक्यांच्या ...
अविनाश कोळी
सांगली : भारतीय बाजारात २०१६ पर्यंत दबदबा निर्माण करणारे चायनीज फटाके आता हद्दपार झाले आहेत. महाराष्ट्रासह फटाक्यांच्या उलाढालीत अग्रेसर असणाऱ्या राज्यातील प्रमुख बाजारपेठा यंदाच्या दिवाळीत शंभर टक्के भारतीय फटाक्यांनी भरल्या आहेत. दर्जा व दराच्या बाबतीत अनेक वर्षे सरस ठरलेल्या चायनीज फटाक्यांना मात देण्यात भारतीय कंपन्यांना यश आले आहे.
भारतीय बाजारातील ९० टक्के फटाक्यांचे उत्पादन तामिळनाडूतील शिवकाशी येथे होते. तरीही शिवकाशीच्या उत्पादकांना अनेक वर्षे चायनीज फटाक्यांच्या शिरकावाची चिंता होती. २०१६ पर्यंत चायनीज फटाक्यांनी ४० ते ५० टक्के बाजार काबीज केला होता. बंदी असलेल्या घातक रसायनांचा वापरही चायनीज फटाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. फटाक्यांचा दर व दर्जा याबाबत चायनीज फटाके भारतीय फटाक्यांपेक्षा उजवे ठरत होते. गेल्या सहा वर्षात भारतीय कंपन्यांनी ग्रीन (पर्यावरणपूरक) फटाक्यांना प्राधान्य देताना दर्जा व दराच्या स्पर्धेत चीनच्या मालावर मात केली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी भारतीय फटाक्यांच्या रंगात रंगणार आहे.
दराची स्पर्धा जिंकली
फोल्ड फायर हा फटाक्यांचा प्रकार आहे. यातील चायनीज बंदूक १ हजार रुपयाला तर मॅगझिन २५० रुपयांना येते. भारतीय बनावटीचे हेच साहित्य केवळ ६०० रुपयांत मिळते. प्रत्येक फटाक्यांत अशी दराची स्पर्धा शिवकाशी तसेच तामिळनाडूच्या विरुद्धूनगर येथील फटाक्यांनी जिंकली आहे.
यंदा वीस टक्के घट
फटाक्यांची भारतीय बाजारातील वार्षिक उलाढाल ५ हजार कोटींच्या घरात आहे. काही राज्यांमध्ये घातलेल्या फटाक्यांच्या बंदीसह बेरियम नायट्रेटच्या बंदीमुळे फटाक्यांच्या उलाढालीत २० टक्के घट झाल्याची माहिती तामिळनाडू फायरवर्क्स असोसिएशनने दिली.
भारतीय बाजारात यंदाच्या दिवाळीत बहुतांश फटाके शिवकाशीचेच आहेत. भारतीय फटाक्यांची उत्पादने चांगली आहेत. चीनचे जागतिक स्तरावर एरिअल डिस्प्ले फायर वर्क्समध्ये वर्चस्व आहे. केंद्र सरकारने या उद्योगाकडे अधिक लक्ष दिल्यास जागतिक स्तरावरही फटाक्यांच्या बाजारात आपला दबदबा निर्माण होऊ शकतो. - जे. तमीलसेल्वन, अध्यक्ष, इंडियन फायर वर्क्स असोसिएशन, शिवकाशी
सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात चायनीज फटाके आता मिळत नाहीत. संपूर्ण बाजारात ९५ टक्के माल हा शिवकाशीचा आहे. सहा वर्षांपूर्वी चायनीज फटाक्यांनी बाजारपेठेत मोठा शिरकाव केला होता. आता ती स्थिती नाही.- श्रीराम मालाणी, व्यापारी, सांगली